Shilpa Shetty : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या (Shilpa Shetty) घरी चोरी करणाऱ्या दोन चोरांना जुहू पोलिसांनी अटक केली आहे. जवळपास 60 ते 70 सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्यानंतर दोन आरोपींची ओळख पोलिसांना पटली. त्यानुसार दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
शिल्पा शेट्टीच्या घरी एका आठवड्यापूर्वी चोरी झाली होती. याप्रकरणी तिने पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर अभिनेत्रीच्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. शिल्पाच्या घरातील महागड्या वस्तूंची चोरी झाली होती. आता पोलिसांनी या महागड्या वस्तू जप्त केल्या असल्याचं समोर आलं आहे.
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या बंगल्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने ती परदेशात होती. त्यावेळी चोरांनी संधी साधून चोरी केली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. शेट्टीच्या मॅनेजरने जुहू पोलिसात तक्रार नोंदवली होती. अर्जुन सुरेश देवेंद्र 26, अजय उर्फ रमेश आरमोगम देवेंद्र 22 अशी या दोन आरोपींची नाव आहेत. जवळपास 60 ते 70 सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्यानंतर या आरोपींची ओळख पोलिसांना पटली. त्यानुसार या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
शिल्पाच्या घरी चोरी करणारे दोन्ही आरोपी सराई चोर असून यांच्यावर मुंबईतल्या विविध पोलीस ठाण्यात देखील गुन्ह्यांची नोंद आहे. जुहूतल्या एका सिने कलाकाराच्या घरी झालेल्या चोरीतही या दोघांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना असून त्या अनुषंगाने पोलीस या दोन्हीही आरोपींकडे चौकशी करत आहेत.
शिल्पा शेट्टीचे आगामी प्रोजेक्ट (Shilpa Shetty Upcoming Project)
शिल्पा शेट्टीचा 'केडी द डेविल' (KD The Devil) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. हा सिनेमा गँगस्टारवर आधारित आहे. या सिनेमात ती दाक्षिणात्य सुपरस्टार ध्रुव सरजासोबत (Dhruva Sarja) स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. कन्नड, हिंदी, तेलुगू, तामिळ आणि मल्याळम अशा पाच भाषांमध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे. शिल्पाचा 'निकम्मा' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला. आता अभिनेत्रीच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या