Shatrughan Sinha :  बॉलिवूडचे शॉर्टगन अभिनेते शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) आता नवीन इनिंग खेळण्यास सज्ज झाले आहेत. शत्रुघ्न सिन्हा पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात उतरणार असल्याची चर्चा होती. त्यानंतर शत्रुघ्न सिन्हा हे ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाऊल ठेवणार आहेत. वेब सीरिज  गँग्ज ऑफ गाझियाबाद या मालिकेतून ते ओटीटीवर  झळकणार आहेत.



या नवीन वेब सीरिजमध्ये आशुतोष राणा, प्रदीप नागर, जतिन सरना, अभिमन्यू सिंह, मुकेश तिवारी, माहिरा शर्मा आणि  सनी लिओनी आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. 






गुन्हेगारी जगतावर आधारीत आहे वेब सीरिज


'गँग्स ऑफ गाझियाबाद' या वेब सीरिजची कथा गुन्हेगारीच्या जगावर आधारित आहे. ही वेब सीरिज एक क्राईम ड्रामा सीरिज आहे. सुमन टॉकीजच्या बॅनरखाली  या वेब सीरिजची निर्मिती विनय कुमार आणि प्रदीप नागर यांनी केली आहे. या वेब सीरिजची गोष्ट कथा लहान शहर आणि गावाच्या वातावरणावर आधारित आहे.  1990 च्या दशकात उत्तर प्रदेशमधील अंडरवर्ल्डशी संबंधित घटना दाखवण्यात येणार आहेत. 






बॉलिवूड आणि राजकारणात शत्रुघ्न सिन्हा यांची छाप 


शत्रुघ्न सिन्हा हे 1970 आणि 1980 चे  दशक शत्रुघ्न सिन्हा यांनी गाजवले. 'मेरे अपने', 'कालीचरण', 'विश्वनाथ', 'काला पत्थर,'दोस्ताना' यांसारख्या चित्रपटांमधील त्यांनी साकारलेल्या भूमिकांचे कौतुक झाले. बॉलिवूडमधील दुसऱ्या इनिंगमध्ये आपल्या दर्जेदार अभिनयाची झलक दाखवली आहे. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'यमला पगला दीवाना: फिर से' या चित्रपटानंतर त्यांनी रुपेरी पडद्यावर भूमिका साकारली नाही. 


मागील काही दशकांपासून ते राजकारणात सक्रिय आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजप नेते, खासदार म्हणून काम केले. काही वर्ष केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी काम केले.  त्यानंतर त्यांनी भाजपला रामराम करत तृणमूल काँग्रेसचा झेंडा हाती घेतला. सध्या ते आसनसोलमधून खासदार आहेत. 


'वो आदमी बहुत कुछ जानता था'  या चित्रपटाच्या निमित्ताने ते चर्चेत आहेत. यामध्ये राजीव खंडेलवाल, कुलभूषण खरबंदा, रणजीत यांसारखे कलाकारही दिसणार आहेत.