Hemangi Kavi :  न्याय्य हक्क, समान अधिकारासाठी महिला चळवळींनी  केलेल्या संघर्षाची आठवण म्हणून जागतिक महिला दिन साजरा करण्यात येतो. काही दशकांपासून महिला दिन  साजरा होत असला तरी महिलांकडे पाहण्याचा पुरुष वर्चस्ववादी दृष्टीकोण आजही कायम असल्याचे दिसते.  अभिनेत्री हेमांगी कवीने (Hemangi Kavi) आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत. परितोष त्रिपाठी यांची कविता तिने शेअर करत या कवितेने माझ्या डोळ्यात पाणी आले असल्याचे हेमांगीने सांगितले. 


हेमांगी कवी आपली मते सोशल मीडियावर सडेतोडपणे व्यक्त करते. जागतिक महिला दिनाच्या (International Women's Day) निमित्ताने हेमांगीने एक पोस्ट लिहीत कविताही शेअर केली आहे. हेमांगीने अभिनेता-कवी परितोष त्रिपाठीचे या कवितेसाठी आभार मानले आहेत. हेमांगीच्या पोस्टवर चाहत्यांसह सेलिब्रिटींनीदेखील सहमती दर्शवली आहे.  


हेमांगीने आपल्या पोस्टमध्ये काय म्हटले?


हेमांगीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, काल चित्रीकरणादरम्यान तू कविता सादर केली आणि माझे डोळे भरून आले. गेल्या काही दिवसांपासून मला मोठ्याने सांगायचे आणि ओरडायचे होते ते प्रत्येक शब्द आणि भावना त्यात असल्याचे हेमांगीने म्हटले. काही लोकांसाठी, कोणत्याही क्षेत्रातील महिलांचे यश महत्त्वाचे समजत नाहीत. अशी लोक फक्त महिलांनी कोणते कपडे परिधान केले, कसा ड्रेस आहे, अशी चर्चा करतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून संस्कृती आणि सभ्यतेच्या नावाखाली ते आम्हाला पुन्हा गुलाम आणि दुबळे करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही हेमांगीने म्हटले. 






एका बाजूला अशी लोक असताना दुसरीकडे तुमच्यासारखी काही माणसे आपला दृष्टीकोण, विचार योग्य ठेवत महिलांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. त्यांच्या पाठिशी उभे राहतात आणि प्रोत्साहन देतात. त्यामुळे आम्ही कोण आहोत, हे आम्हाला कळते असेही  हेमांगीने म्हटले. 


दरम्यान, ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ (Madness Machaenge India Ko Hasaenge) या कार्यक्रमात हेमांगी कवी ही अभिनेता कुशल बद्रिकेसह सहभागी होणार आहे. या शो मध्ये परितोष त्रिपाठी, स्नेहिल दीक्षित मेहरा (बीसी आंटी), गौरव दुबे, केतन सिंह, अंकिता श्रीवास्तव, इंदर साहनी आदी कलाकार सहभागी होणार आहेत.  9 मार्चपासून हा कार्यक्रम सोनी एंटरटेन्मेंट वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.