मुंबई : 500 कोटी रुपयांच्या ऑनलाईन घोटाळ्याविरोधात केलेल्या तक्रारीत बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि नवाझुद्दिन सिद्दीकी यांची नावं आली आहेत. गाझियाबादमधील वेबवर्क ट्रेड लिंक्सवर घोटाळ्याचा आरोप असून सीबीआयने चौकशी सुरु केली आहे.

वेबवर्क ट्रेड लिंक्सचे प्रमोटर अनुराग जैन आणि संदेश वर्मा यांनी अॅड्सबुक.कॉम या बनावट कंपनीच्या आधारे दोन अभिनेत्यांची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड करुन नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

10 डिसेंबर 2016 रोजी नवाझुद्दिन सिद्दीकी आणि शाहरुख खानसोबत अॅड्सबुक मार्केटिंग प्रायव्हेट ही बनावट कंपनी उघडल्याचं एफआयआरमध्ये म्हटलं आहे. दोघा सेलिब्रेटींमुळे प्रभावित होऊन अनेकांनी या कंपनीत मोठी गुंतवणूक केल्याचा आरोप आहे. जैन आणि वर्मा यांनी वेबसाईटवरील जाहिरातीत प्रत्येक क्लिकवर आकर्षक बक्षिस जिंकण्याच्या आमिषाने पैसे लाटल्याचंही तक्रारीत म्हटलं आहे.

चार महिन्यांच्या कालावधीत चार लाख जणांना सभासदत्व दिलं असून दोन लाख व्यक्तींकडून एकूण 500 कोटी घेतल्याचा आरोप आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी मात्र नवाझ किंवा शाहरुख यांना आरोपी किंवा संशयित म्हटलेलं नाही. सीबीआयने हे प्रकरण हाती घेतलं असून जैन आणि वर्मावर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.