मुंबई : अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत पुन्हा एकद आई-बाबा बनणार असल्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालं आहे. मीडियामध्ये मीराच्या प्रेग्नंसीबाबत अनेक शक्यता वर्तवण्यात जात होत्या. शिवाय शाहिद आणि मीरानेही यावर मौन बाळगलं होतं.

परंतु आता खुद्द शाहिदनेच मीरा प्रेग्नंट असल्याच्या वृत्तावर मोहर लावली आहे. शाहिदने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अतिशय क्यूट फोटो पोस्ट करुन आपल्या घरी लवकरच दुसरा छोटा पाहुणा येणार असल्याची गुडन्यूज शेअर केली आहे.

या फोटोमध्ये शाहिद आणि मीराची मुलगी मिशाने गोड पोज दिली असून तिच्याशेजारी फुग्यांच्या चित्रासह बिग सिस्टर लिहिलेलं दिसत आहे. त्यामुळे मीरा प्रेग्नंट असून लवकरच त्यांच्या घरी दुसऱ्यांदा पाळणा हलणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.


फिल्मी इव्हेंट्समध्ये मीरा कायमचं सैल कपड्यांमध्ये तिचं बेबी बंप लपवताना दिसत होती. त्याचवेळी मीरा प्रेग्नंट असल्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यावेळी ही फक्त अफवा असल्याचं सांगितलं जात होतं.

मात्र आता शाहिदच्या या पोस्टनंतर त्याचे चाहते फारच आनंदी दिसत आहे. या पोस्टच्या लाईक्सची संख्या लाखोंच्या घरात असून चाहत्यांनी दोघांना शुभेच्छा देण्यासही सुरुवात केली आहे.

शाहिद आणि मीराचं लग्न 2015 मध्ये झालं होतं. त्यानंतर वर्षभरातच मिशाचा जन्म झाला. आता हे जोडपं दुसऱ्या बाळाच्या आगमनाची वाट पाहत आहेत.