Jawan: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या त्याच्या 'जवान' (Jawan) या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. 2023मध्ये शाहरुख खानचे एकूण 3 चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यापैकी एका चित्रपटामध्ये तो अॅक्शन अवतारात दिसणार आहे. साऊथचे चित्रपट निर्मात अॅटली याच्या आगामी ‘जवान’ या चित्रपटात शाहरुख जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या टीझरमध्ये शाहरुख एका वेगळ्या अंदाजात दिसला आहे. शाहरुख खान बऱ्याच दिवसांनी पडद्यावर परतत असून प्रत्येकजण त्याच्या चित्रपटाची वाट पाहत आहे. आता हा चित्रपट त्याच्या जबरदस्त कमाईमुळे चर्चेत आला आहे.
शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटाने रिलीजपूर्वी 250 कोटींची कमाई केली आहे. अॅटली दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुख खानसोबत अभिनेता विजय सेतुपती आणि अभिनेत्री नयनतारा यांच्यासारखे सुपरस्टार देखील झळकणार आहेत.
चित्रपटाचं बजेट वसूल
शाहरुख खानचा आगामी 'जवान' हा चित्रपट ओटीटी आणि सॅटेलाईट हक्कांमुळे चर्चेत आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार या चित्रपटाचे ओटीटी आणि सॅटेलाईट अधिकार मोठ्या रकमेत विकले गेले आहेत. शाहरुख खानने या चित्रपटाचे हक्क विकून चित्रपटाच्या एकूण बजेटइतके पैसे कमावले आहेत. अर्थात आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर येणारा सगळा पैसा हा केवळ नफा असणार आहे.
चित्रपटाचे सॅटेलाईट हक्क झीटीव्हीने विकत घेतले आहेत. तर, OTT अधिकार Netflix कडे आहेत. LetsCinema या ट्विटर हँडलवर दिलेल्या माहितीनुसार, 'जवान' चित्रपटाचे ओटीटी आणि सॅटेलाईट अधिकार 250 कोटींना विकले गेले आहेत. ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'शाहरुख खानच्या बिग बजेट अॅक्शन एंटरटेनर, अॅटली दिग्दर्शित, जवान चित्रपटाचे सॅटेलाईट हक्क झीटीव्हीने विकत घेतले आहेत आणि नेटफ्लिक्सने डिजिटल अधिकार 250 कोटींना विकत घेतले आहेत.’ मात्र, अद्याप यावर निर्मात्यांची कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
व्यस्त अभिनेता शाहरुख खान!
अभिनेता शाहरुख खान सध्या तीन चित्रपटांवर काम करत आहे. त्याच्या 'पठाण' या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. मात्र, सध्या त्याचे डबिंगचे काम बाकी आहे. 'जवान' आणि 'डंकी'चे शूटिंगदेखील अजून सुरू आहे. या सगळ्यात तो 'टायगर 3' मध्ये कॅमिओ करतानाही दिसणार आहे. रिपोर्ट्सनुसार, शाहरुख येत्या दोन महिन्यात 'जवान'चे शूटिंग पूर्ण करणार आहे. यानंतर तो एका नव्या प्रोजेक्टवर काम सुरू करणार आहे. मात्र, रिलीज आधीच शाहरुख खानने ‘जवान’ चित्रपटाचे हक्क विकून बिग बजेट चित्रपटाच्या बजेटइतकी कमाई केली आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: