नवी दिल्लीः भारतीय जवानांचा अपमान केल्याप्रकरणी ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांच्या विरोधात मुंबई, आग्रा आणि लखनौमध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सैनिकांना लष्करात भरती व्हायला कोणी सांगितलं, असं वादग्रस्त विधान ओम पुरी यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात केलं.

जवान देशासाठी  शहीद होतात, त्यांचा आदर ठेवायला पाहिजे की पाकिस्तानी कलाकारांचं समर्थन करायला पाहिजे, असा प्रश्न ओम पुरींना विचारण्यात आला. जवान शहीद होतात तर त्यांना सैन्य दलात भरती व्हायला कोणी सांगितलं, हातात बंदूक घ्यायला कोणी सांगितलं, असं विधान ओम पुरींनी केलं.

''सरकार पाकिस्तानवर कारवाई करत आहे. तर आपण सर्वांनी शांत रहायला पाहिजे. आपण मी अनेकदा पाकिस्तानला गेलो आहे. तिथल्या नागरिकांनाही भेटलो आहे. पाकिस्तानी कलाकार भारतात येतात, ते व्हिसा घेऊन येतात, बेकायदेशीरपणे येत नाहीत. एखादा सिनेमा सोडून ते मध्येच गेले तर निर्मात्याचं मोठं नुकसान होतं, असं वक्तव्य ओम पुरी यांनी केलं.

यापूर्वी अभिनेता सलमान खाननेही पाकिस्तानी कलाकारांचं समर्थन केलं होतं. त्यानंतर ओम पुरी यांनी जाहिरपणे पाकिस्तानी कलाकाराचं समर्थन करत जवानांवरही वादग्रस्त विधान केलं. यामुळे देशभरात संताप व्यक्त केला जात आहे.