Shah Rukh Khan Struggle :  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांना स्ट्रगलच्या काळातून जावे लागते. बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान (Shahrukh Khan) यालाही स्ट्रगलच्या काळातून जावे लागले आहे. आपल्या स्ट्रगलच्या काळात शाहरुखची कारही जप्त झाली आहे. शाहरुख खानची जवळची मैत्रीण, अभिनेत्री जुही चावलाने हा किस्सा सांगितला आहे.


शाहरुख खानसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलेल्या जुही चावलाने सांगितले की,  एक काळ होता जेव्हा शाहरुख खानकडे ईएमआय भरण्यासाठीदेखील पैसे नव्हते. ईएमआय भरू न शकल्याने शाहरुखची जिप्सी कार जप्त करण्यात आली होती. जुही चावलाने शाहरुख खानच्या स्ट्रगलच्या दिवसांना उजाळा दिला. मुंबईत घर नसतानाही शाहरुख हा कसा दररोज 2-3 शिफ्टमध्ये काम करायचा हेदेखील जुही चावलाने सांगितले. 


जुही चावला आणि शाहरुख खान यांच्यात चांगली मैत्री आहे. 'राजू बन गया जंटलमॅन' या चित्रपटाही जोडी पहिल्यांदा एकत्र झळकली होती. दोघांनी फक्त अनेक चित्रपटांमध्ये काम केले नाही तर आज दोघेही बिझनेस पार्टनर आहेत. जुही चावला देखील शाहरुख खानच्या आयपीएल टीम केकेआरचा एक भाग आहे.


जुहीने सांगितला किस्सा 


'गुजरात चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री'च्या एका कार्यक्रमादरम्यान शाहरुख खानबद्दल बोलताना जुही चावलाने सांगितले की, 'मला आठवतं की त्या दिवसात शाहरुखचं मुंबईत घर नव्हतं. दिल्लीहून आल्यानंतर तो कुठे राहिला हे मला माहीत नाही. अशा स्थितीत तो फिल्म युनिटसोबत चहा प्यायचा आणि फिल्म क्रूसोबत जेवणही करायचा, त्यामुळे तो सगळ्यांसोबत पटकन जुळवून घ्यायचा, त्यांचाच एक भाग असायचा. 


जुहीने सांगितले की, त्यावेळी शाहरुख 2-3  शिफ्टमध्ये काम करायचा. 1992 मध्ये एकीकडे शाहरुख माझ्यासोबत राजू बन गया जंटलमॅन करायचा आणि दुसरीकडे दिल आशना है चित्रपटाचे चित्रीकरण करायचा. त्याच वेळी दिव्या भारतीसोबत 'दिवाना' चित्रपटाचेही चित्रीकरण करत होता.


शाहरुखच्या कारवर जप्ती 


जुही चावलाने शाहरुखचा एक किस्सा सांगताना म्हटले की, 'त्यावेळी शाहरुख खानकडे काळी जिप्सी  असायची. पण एके दिवशी ईएमआय न भरल्यामुळे जिप्सी जप्त करण्यात आली होती. त्यावेळी शाहरुख खूप निराश होऊन सेटवर आला. त्यादरम्यान मी त्याला सांगितले की काळजी करू नकोस, एक दिवस तुझ्याकडे अशा अनेक गाड्या असतील. शाहरुखला हे आजही आठवतंय कारण ते खरं ठरलं, आज तो कुठे पोहोचला पाहा, असे जुहीने म्हटले.






शाहरुख आणि जुहीचं बॉन्डिंग


शाहरुख आणि जुही चोप्रा यांनी यश चोप्रा यांच्या 'डर', महेश भट्ट यांच्या'डुप्लिकेट', राजीव मेहरांच्या 'राम जाने', अजीज मिर्झाच्या 'फिर भी दिल है हिंदुस्तानी' आणि 'वन 2 का 4' यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. दोघांनी मिळून 2000 मध्ये अझीझ मिर्झासोबत ड्रीमझ अनलिमिटेड नावाचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले.