भन्साळींच्या चित्रपटात शाहरुख-सलमान एकत्र?
एबीपी माझा वेब टीम | 04 Nov 2018 01:32 PM (IST)
सलमान-शाहरुखची मुख्य भूमिका असलेला संजय लीला भन्साळी दिग्दर्शित आगामी चित्रपट फॅमिली ड्रामा असू शकतो
मुंबई : बॉलिवूडचे दोन सुपरस्टार शाहरुख खान आणि सलमान खान मोठ्या पडद्यावर एकत्र झळकण्याची शक्यता आहे. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या आगामी चित्रपटात शाहरुख-सलमान एकत्र दिसण्याचे संकेत आहेत. यापूर्वी, करण अर्जुन (1995), कुछ कुछ होता है (1998), हम तुम्हारे है सनम (2002) या चित्रपटात शाहरुख-सलमानएकत्र झळकले आहेत. नुकताच, सलमानच्या 'ट्यूबलाईट' सिनेमात शाहरुखने कॅमिओ केला होता, तर शाहरुखच्या आगामी 'झिरो' चित्रपटात सलमान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार आहे. मात्र पूर्ण चित्रपटात त्यांना एकत्र पाहणं दोघांच्याही चाहत्यांसाठी पर्वणी असेल. 'सलमान-शाहरुखची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट फॅमिली ड्रामा असेल. दिलीप कुमार-राज कुमार यांच्या सौदागर चित्रपटाप्रमाणे 'दोस्त बने दुश्मन' या थीमवर हा चित्रपट आधारित असेल. दोघांनाही पडदा शेअर करण्याची इच्छा होती. भन्साळींचा हा सिनेमा उत्तम संधी असेल' असं मिड-डे वृत्तपत्रात म्हटलं आहे. चित्रपटाची स्क्रिप्ट पूर्ण होण्यास आणखी नऊ महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यानंतर 2019 च्या अखेरीस प्रत्यक्ष शूटिंगला सुरुवात होईल.