Cricket Match With Taapsee : अभिनेत्री तापसी पन्नूचा (Taapsee Pannu) ‘शाबास मिथू’ (Shabbas Mithu) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री तापसी पन्नू, क्रिकेटपटू मिताली राज यांची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट मिताली राजचा (Mithal Raj) बायोपिक आहे. सध्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरु आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलेल्या मिताली राज आणि तापसी पन्नू या नुकत्याच एक क्रिकेट मॅच देखील खेळल्या. क्रिकेटच्या या सामन्यात एकूण चार टीम सामील झाल्या होत्या. यावेळी पत्रकार आणि माध्यमांच्या इतर प्रतिनिधींनादेखील त्यांच्यासोबत क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली.


या सामन्यात एक टीम मिताली राज, एक टीम तापसी पन्नू, एक टीम चित्रपटाचे दिग्दर्शक सृजित मुखर्जी आणि एक टीम वायकॉम (निर्माता) प्रमुख अजित अंधारे यांची होती. क्रिकेट सामन्यांची विशेष बाब म्हणजे पत्रकार, फोटोग्राफर आणि व्हिडीओग्राफर यांनाही या प्रत्येक संघात खेळण्याची संधी मिळाली.


अंतिम बाजी दिग्दर्शकाने जिंकली!


या सामन्याच्या अंतिम फेरीत मिताली राज आणि दिग्दर्शक सृजित मुखर्जी यांची टीम पोहोचली होती. मात्र, अंतिम फेरीत सृजित मुखर्जी यांच्या टीमने बाजी मारली. हा सामना चार-चार ओव्हर्सचा होता. अंधेरीच्या सेलिब्रेशन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये हा क्रिकेट सामना आयोजित करण्यात आला होता.


मॅच खेळताना तापसीने देखील गोलंदाजी आणि फलंदाजीचा आनंद लुटला होता. खेळाडू म्हणून ती फार काही करू शकली नसली, तरी सामन्यादरम्यानचा तिचा उत्साह पाहण्यासारखा होता. जेव्हा इतर संघ एकमेकांविरुद्धचे सामने खेळत होते, तेव्हा तापसी देखील हातात माईक धरून धमाकेदार कॉमेंट्री करताना दिसली.


मितालीनेही दाखवली आपली हटके स्टाईल!


तापसीप्रमाणेच मितालीनेही टेनिस बॉलने इनडोअर क्रिकेट सामना खेळताना खूप उत्साह दाखवला आणि आपण एक चांगली खेळाडू असल्याचा दाखला दिला. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात आपले प्रभुत्व दाखवत मितालीने लोकांची मने जिंकली. पण, ती आपल्या संघाला अंतिम सामना जिंकून देण्यात अपयशी ठरली. सामने सुरू होण्यापूर्वी तापसी आणि मिताली यांनी बायोपिकबद्दल आपला आनंद देखील व्यक्त केला.


संबंधित बातम्या


Shabaash Mithu Release Date : ठरलं! तापसीचा ‘शाबास मिथू’ चित्रपट ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार!


Shabaash Mithu Trailer : ‘शाबास मिथू’ च्या ट्रेलरचं दिग्गजांकडून कौतुक, सचिन-सौरव म्हणाले...