फडणवीसांनी 5 कोटींना देशभक्ती विकत घेतली : शबाना आझमी
एबीपी माझा वेब टीम | 23 Oct 2016 09:07 PM (IST)
मुंबई : करण जोहर दिग्दर्शित 'ऐ दिल है मुश्किल' चित्रपटाच्या वादात मध्यस्थी करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी टीकेची झोड उठवली आहे. फडणवीसांनी पाच कोटींना देशभक्ती विकत घेतल्याची विखारी टीका आझमींनी केली आहे. 'केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी 'ऐ दिल..' चित्रपटाला शांततापूर्ण वातावरणात प्रदर्शित होऊ देण्याची हमी दिली असतानाच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मात्र मध्यस्थी केली आणि पाच कोटी रुपयांना देशभक्ती विकत घेतली. किती दुर्दैवी आहे हे!' अशी खंत शबाना आझमी यांनी व्यक्त केली आहे. https://twitter.com/AzmiShabana/status/790034863562821632 कायदा आणि सुव्यवस्था पाळण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी मनसेसोबत व्यवहार करणं चुकीचं आहे, असं म्हणतानाच ही संघ परिवाराची जुनी कार्यपद्धत असल्याची टीकाही त्यांनी केली. फडणवीसांना राजनाथ सिंह यांनी दिलेल्या हमीचाही अनादर केला आहे. भाजपने त्यांच्याकडे स्पष्टीकरण मागायला हवं, असंही आझमी यांनी सुचवलं आहे. https://twitter.com/AzmiShabana/status/790036844750798848 https://twitter.com/AzmiShabana/status/790037436873187328 'मी राष्ट्रभक्त आहे की नाही हे मनसे ठरवणार? मी भारतीय संविधानापुढे नतमस्तक होते, पण राज ठाकरे नाहीत. आता सांगा कोणाच्या राष्ट्रभक्तीवर प्रश्न उपस्थित करायचा?' असा सवालही शबाना आझमींनी विचारसा आहे. https://twitter.com/AzmiShabana/status/790038828732059652 https://twitter.com/AzmiShabana/status/790039647493693440 मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 'ऐ दिल..'च्या प्रदर्शनाला सशर्त परवानगी दिल्यानंतर राज ठाकरेंवरच टीकेची झोड उठली आहे. तर या वादात मध्यस्थी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनाही लक्ष्य केलं जात आहे. भारतीय सैन्याला स्वत:चा स्वाभिमान आहे. त्यांना खंडणीतून उकळलेला पैसा नको. म्हणून भारतीय सैन्याने पैसे घेणे नाकारलं, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केला. ‘ऐ दिल है मुश्किल’ सिनेमाचा तिढा मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर सुटला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, दिग्दर्शक करण जोहर, निर्माते मुकेश भट यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर बैठक झाली. त्यानंतर राज ठाकरेंनी काही अटी ठेवून ‘ऐ दिल है मुश्किल’च्या प्रदर्शनाचा विरोध मागे घेतला. पाकिस्तानी कलाकारांना सिनेमात घेणाऱ्या निर्मात्यांनी आर्मी वेल्फेअर फंडाला 5-5 कोटी रुपये द्यावे, यापुढे पाक कलाकारांना चित्रपटात घेऊ नये, अशा काही अटींनंतर प्रदर्शनाला हिरवा कंदील दाखवण्यात आला. राज ठाकरेंच्या या अटीवर सोशल मीडियासह अनेक स्तरावरुन टीकाही झाली.