Sahara On Scam 2010 Web Series :  दिग्दर्शक-निर्माते हंसल मेहता (Hansal Mehta) यांनी आपली आगामी वेब सीरिज 'स्कॅम 2010- द सुब्रत रॉय सागा' ची (Scam 2010 Web Series) घोषणा केली. मात्र, ही वेब सीरिज रिलीज होण्यापूर्वीच वादात अडकण्याची शक्यता आहे. ही वेब सीरिज  तमल बंदोपाध्याय यांनी लिहिलेल्या  'सहारा: द अनटोल्ड स्टोरी'या पुस्तकावर आधारीत आहे. ही वेब सीरिज दिवंगत व्यावसायिक आणि सहारा ग्रुपचे संस्थापक सुब्रत रॉय यांच्या जीवनावर,  त्यांच्या घोटाळ्यावर आधारीत असणार आहे. 'स्कॅम 2010' ची घोषणा झाल्यानंतर आता सहारा परिवारने आपली नाराजी व्यक्त केली आहे. 


सहारा इंडिया परिवाराने जारी केलेल्या निवेदनात ही वेब सीरिज एक प्रपोगंडा असल्याचे म्हटले.'सहारा इंडिया परिवार हा वेब सीरिजमध्ये सहभागी असलेल्या सर्व संबंधितांचा निषेध करत असून त्यांच्या अपमानास्पद व्यवहाराचा विरोध करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. वेब सीरिजशी संबंधित असलेल्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याबाबतचाही विचार करत असल्याचेही निवेदनात म्हटले. 


सहारा इंडियाने काय म्हटले?


सहारा इंडिया परिवारने आपल्या निवेदनात म्हटले की,  सेबी आणि सहारा यांच्यातील कायदेशीर प्रकरण अजूनही सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे आणि या प्रकरणाच्या कार्यवाहीवर प्रभाव टाकण्याचा कोणताही प्रयत्न न्यायालयाचा अवमान होईल. असे करणे गुन्हा ठरेल. अभिव्यक्ती आणि कृती स्वातंत्र्याच्या नावाखाली, स्वतःचा बचाव करण्यासाठी नसलेल्या व्यक्तीची सद्भावना आणि प्रतिष्ठा कमी करण्याची परवानगी कोणालाही दिली जाऊ शकत नाही असेही सहारा इंडिया परिवाराने सांगितले. 






हंसल मेहता यांची वेब सीरिज अपमानास्पद


निवेदनात पुढे म्हटले की, 'वेब-सीरिजच्या शीर्षकामध्ये घोटाळा हा शब्द वापरणे आणि त्याचा सहाराशी संबंध जोडणे अपमानास्पद आहे. ही बाब सहारा आणि सहारा इंडिया परिवाराच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणारी आहे. सहारा इंडिया परिवार कधीही कोणत्याही चिट फंडशी संबंधित घोटाळ्यात सामील झाला नाही.सहारा-सेबीचा मुद्दा हा सहाराने जारी केलेल्या OFCD बाँड्सवर सेबीच्या अधिकारक्षेत्राचा वाद होता, असे कंपनीच्यावतीने सांगण्यात आले. 


हंसल मेहता यांनी काय म्हटले?


हिंदुस्तान टाईम्सने याबाबत हंसल मेहता यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी आपण सध्या लंडनमध्ये शूटिंग करत असून मला याबाबत काहीही माहिती नाही.