Scam 2010 Hansal Mehta :   'स्कॅम 1992' (Scam 1992) आणि 'स्कॅम 2003' (Scam 2003) या धमाकेदार वेब सीरिजनंतर आता दिग्दर्शक हंसल मेहता (Hansal Mehta) आणखी एका घोटाळ्याची गोष्ट प्रेक्षकांसमोर आणणार आहे. 2010 मध्ये उघडकीस आलेला हा घोटाळा 25 हजार कोटींचा घोटाळा होता. हंसल मेहता या वेब सीरिजमध्ये सहाराचे सुब्रत रॉय (Subrata Roy) यांच्या घोटाळ्यावर भाष्य करणार आहे. सुब्रत रॉय यांचे काही महिन्यांपूर्वीच दीर्घ आजाराने निधन झाले होते. 


हंसल मेहता यांनी याआधीच्या 'स्कॅम 1992'  वेब सीरिजमध्ये  हर्षद मेहता याचा शेअर बाजार घोटाळा आणि 'स्कॅम 2003' या वेब सीरिजमध्ये अब्दुल तेलगी याचा स्टॅम्प पेपर घोटाळा याचे चित्रण करण्यात  आले होते. या घोटाळ्यांची सुरुवात, त्याची व्याप्ती, घोटाळ्यामुळे उमटलेले राजकीय पडसाद यावर प्रकाश टाकण्यात आला होता. आता, हंसल मेहता सुब्रत रॉय यांच्या घोटाळ्याची गोष्ट सांगणार आहेत.


हंसल मेहता यांनी दिली माहिती...


हंसल मेहता यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे स्कॅमच्या पुढील सीरिजची घोषणा केली. हंसल मेहता यांनी या वेब सीरिजचे पोस्टर लाँच केले. ही वेब सीरिज लवकरच  सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. हंसल मेहता यांनी आपल्या वेब सीरिजचे नाव  'स्कॅम 2010: द सुब्रत रॉय सागा'असे ठेवले आहे. 


 






काय आहे सुब्रत रॉय यांचा घोटाळा?


हंसल मेहता यांची आगामी वेब सीरिज स्कॅम 2010 ही तमल बंदोपाध्याय यांनी लिहिलेल्या 'सहारा: द अनटोल्ड स्टोरी' या पुस्तकावर आधारीत आहे. सुब्रत रॉय हे सहारा ग्रुप ऑफ बिझनेसचे संस्थापक होते. या पुस्तकात सुब्रत रॉय यांच्यावर चिट-फंड हेराफेरीपासून ते बनावट गुंतवणूकदारांपर्यंतच्या आरोपांवर भाष्य करण्यात आले आहे. सुब्रत रॉय यांना गुंतवणूकदारांची  फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. रॉय हे दोन वर्षांहून अधिक काळ तुरुंगात राहिले. त्यानंतर 2016 मध्ये पॅरोलवर त्यांची सुटका झाली. यानंतर सेबीने सर्वोच्च न्यायालयात त्यांचा पॅरोल रद्द करण्याची मागणी केली आणि त्यांना पुन्हा तुरुंगात टाकण्यात आले. सुब्रत रॉय यांच्यावर 25 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.