मुंबई : ‘पद्मावत’शी टक्कर टाळण्यासाठी आपल्या पॅडमॅन या सिनेमाचं प्रदर्शन अभिनेता अक्षय कुमारने पुढे ढकललं आहे. त्याबद्दल ‘पद्मावत’चे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी अक्षय कुमारचे आभार मानले. दोन्ही सिनेमे एकाच दिवशी म्हणजे 25 जानेवारीला रिलीज होणार होते.


अक्षय कुमार आणि संजय लीला भन्साळी यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. ''अनेक संकटांचा सामना करत अखेर 'पद्मावत'च्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला आहे. मात्र सिनेमाची 'पॅडमॅन'शी टक्कर होत होती. त्यामुळे अक्षय कुमारला प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याची विनंती केली आणि त्याने लगेच होकार दिला. या सहकार्याबद्दल त्याचा नेहमी ऋणी राहिल'', असं भन्साळी म्हणाले.

'पॅडमॅन'चं प्रदर्शन पुढे ढकलल्यामुळे दोन्हीही सिनेमांना फायदा होईल. 'पॅडमॅन' आता 25 जानेवारी ऐवजी 9 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. पद्मावत रिलीज झाल्यानंतर पॅडमॅन जवळपास दोन आठवड्यांनी रिलीज होणार आहे. त्यामुळे दोन्हीही सिनेमांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार नाही. दरम्यान, 'पद्मावत'ला देशभरात विविध ठिकाणी विरोध होत आहे.

सेन्सॉर बोर्डाच्या परवानगीनंतरही राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि हरियाणा या भाजपशासित राज्यांमध्ये 'पद्मावत'च्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली होती. या विरोधात सिनेमाच्या निर्मात्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. निर्मात्यांना दिलासा देत सिनेमा सर्व राज्यांमध्ये प्रदर्शित करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला होता.