सलमान आणि संजय लीला भन्साळी 10 वर्षांनी एकत्र येणार!
एबीपी माझा वेब टीम | 08 Jun 2017 10:51 PM (IST)
मुंबई : सुपरस्टार सलमान खान आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी एकत्र येणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून रंगली होती. मात्र त्यावर आता स्वतः संजय लीला भन्साळींनीच शिक्कामोर्तब केलं आहे. सलमान आणि मी तब्बल दहा वर्षानंतर एकत्र येत असल्याची माहिती भन्साळींनी सलमानसोबतचा जुना फोटो शेअर करुन दिली आहे. त्यामुळे हे दोन दिग्गज पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झालं आहे. भन्साळींसोबत एका मोठ्या प्रोजेक्टबाबत चर्चा चालू असल्याचं स्पष्टीकरण सलमानने काही दिवसांपूर्वीच दिलं होतं. मात्र भन्साळींनी यावर मौन बाळगलं होतं. मात्र आता जुने वाद विसरुन दोघेही पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. 'सावरिया' हा सलमान आणि भन्साळींचा अखेरचा सिनेमा होता. या सिनेमातून रणबीर कपूर आणि सोनम कपूरने बॉलिवूड पदार्पण केलं होतं.