मुंबई : आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने केवळ दाक्षिणात्यच नव्हे तर बॉलिवूडवर छाप टाकलेल्या समंथाच्या (Samantha Ruth Prabhu) आरोग्याविषयी एक महत्त्वाची अपडेट हाती आली आहे. संमंथा मायोसायटिस (Myositis) या दुर्मिळ आणि गंभीर आजाराने ग्रस्त असल्याचं समोर आलं आहे. समंथाने तिचा हॉस्पिटलमधील एक फोटो शेअर करत याची माहिती दिली आहे. त्यामुळे समंथाचे चाहते काळजीत पडले असून तिच्या या पोस्टवर अनेक कमेंट्स आल्या आहेत. 


'पुष्पा' या तेलगू चित्रपटातील 'ऊ अंटावा' या आयटम सॉंगमुळे समंथा चांगलीच चर्चेत आली होती. त्यानंतर तिच्या फॅन फोलोअर्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी समंथा नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. यामध्ये ती आपले रोजचे अपडेट्स त्यावर शेअर करत असते. आताही समंथाने हॉस्पिटलमधील एक फोटो शेअर केला आहे. 


समंथाने इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर करताना सांगितलं की ती मायोसिटिस नावाच्या एका दुर्मिळ आजाराशी लढत आहे. यातून बरं होण्यासाठी आपल्याला थोडा अधिक वेळ लागत आहे. 


काय लिहिलंय समंथाने? 


"यशोधाच्या ट्रेलरवर तुमची प्रतिक्रिया जबरदस्त होती. तुमचे हेच प्रेम मला अनेक आव्हानांना तोंड देण्यासाठी बळ देतं. काही महिन्यापूर्वी मला मायोसिटिस नावाचा आजार असल्याचं निदान झालं. तो बरा झाल्यानंतर मी आपल्याशी त्याबद्दल शेअर करायचं ठरवलं होतं. पण यातून बरं होण्यासाठी मला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागतोय. यातून मी पूर्णपणे बरी होईन असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. मी अनेक बरे-वाईट दिवस पाहिलेत. जेव्हा मला असं वाटतंय की मी यातून आता अजून एक दिवसही काढू शकत नाही, स्वत: ला सांभाळू शकत नाही, त्यावेळी कसातरी तो क्षण निघून जातो. त्यामुळे मी आता यातून बरं होण्यापासून केवळ एखादा दिवस दूर असल्याचं मला वाटतंय."


 






काय आहे मायोसिटिस? 


आपल्या शरीरातील मांस पेशींना आलेल्या सूजेमुळे मायोसिटिस हा आजार जडत असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय. हा आजार पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना हा आजार होण्याची शक्यता अधिक असते असंही म्हटलं जातं. मायोसिटिस ही एक अशी ऑटोइम्युन कंडिशन असते ज्याचा परिणाम शरीरातील मांस पेशींवर होतो.