मुंबई: सुपरस्टार सलमान खानच्या 'ट्यूबलाईट' सिनेमाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. सलमानचे ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या सिनेमांपैकी ट्यूबलाईनं पहिल्या दिवशी सर्वात कमी कमाई केली आहे.


शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या या सिनेमानं 21.15 कोटीची कमाई केली आहे. ट्रेंड अॅनालिस्ट तरुण आदर्शनं ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे.

ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ट्यूबलाईटनं पहिल्या दिवशी म्हणावी तशी कमाई केली नाही. गेल्या काही वर्षांपासून सलमाननं ईदच्या मुहूर्तावर सिनेमा रिलीज करण्याचा ट्रेंड सुरु केला आहे. त्याचं हे समीकरण आतापर्यंत बरंच चांगलं जुळून आलं होतं. पण मागील काही सिनेमांच्या पहिल्या दिवसाची कमाई पाहता ट्यूबलाईटची कमाई तशी कमीच झाली आहे.


2016 साली ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या सुलताननं पहिल्याच दिवशी 36.54 कोटींची कमाई केली होती.

तर त्याआधी प्रदर्शित झालेल्या 'बजरंगी भाईजान'नं पहिल्या दिवशी 27.25 कोटीची कमाई केली होती.

किक सिनेमानं पहिल्या दिवशी 26.4 कोटीची कमाई केली होती.

एक था टायगर सिनेमानं पहिल्या दिवशी तब्बल 32.93 कोटींची कमाई केली होती.


दरम्यान, ट्यूबलाईट हा सिनेमा 1962च्या भारत आणि चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर बेतलेला आहे. या सिनेमात सलमानचा भाऊ सोहल खान आणि बाल कलाकार मातिन रे तंगू आणि चीनी अभिनेत्री झू झू हे प्रमुख भूमिकेत आहेत.


कबीर खाननं या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून सिनेमाची कथाही त्यानेच लिहली आहे. एक था टायगर, बजरंगी भाईजान या सिनेमानंतर सलमानचा ट्यूबलाईट हा कबीरसोबतचा तिसरा सिनेमा आहे.