सलमान खानच्या राधेला रसिकांकडून ठेंगा दाखवण्यात आल्याचं चित्र आहे. राधे-युवर मोसेट वाँटेड भाई हा चित्रपट ईदच्या औचित्याने प्रदर्शित झाला. या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू होती. एकतर सलमान खानचा बऱ्याच काळानंतर येणारा हा चित्रपट होता. शिवाय, हा सिनेमा ओटीटीवर येणार असल्याने घराघरांत पाहिला जाईल अशी चर्चा होती. सलमान खान, दिशा पटानी, रणदीप हुडा अशी कास्ट असल्यामुळे सिनेमाबद्दल उत्सुकता होती. पण नेटकऱ्यांनी राधेला ठेंगा दाखवला आहे. इतकंच नव्हे, तर राधेवरून खूप सारे मिम्स आणि विनोद व्हायरल होऊ लागले आहेत. 


आयएमडीबी ही साईट रसिकांच्या प्रतिक्रियांवर लक्ष ठेवून असते. मोठा सिनेमा आला की त्यावर रसिकांच्या उड्या पडतात. शिवाय, त्यांना सिनेमा आवडला तर त्याचं रेटिंग वर जात आणि नावडला तर खाली येतं. राधेला या रेटिंगचा मोठा फटका बसला आहे. आयएमडीबीवर या सिनेमानं मिळवलेलं रेटिंग आहे 2.4. सलमान खानच्या या सिनेमाने रसिकांची निराशा केली आहे. हा चित्रपट 13 तारखेला रिलीज झाल्यानंतर दुपारी 12 वाजल्यापासून या सिनेमावर उड्या पडल्या. जवळपास 10 लाख लोक एकाचवेळी हा चित्रपट पाहात होते. त्यातही वाढ होऊ लागली. परिणामी झीचा ओटीटी प्लॅटफॉर्म क्रॅश झाला. त्यानंतर काही काळात तो पूर्ववत करण्यात आला. इतक्या उड्या पडल्यानंतर हा चित्रपट रसिकांना आवडत आहे, असं चित्र निर्माण झालं होतं. पण सिनेमाचे रिव्ह्यू आले आणि हा सगळा फुगा फुटला. 


राधे चित्रपट रिलीज झाल्यानंतर या सिनेमावर बरीच मिम्स आली. कोरोना व्हॅक्सिनवरून तर राधेला फारच झोडपण्यात आलं आहे. अनेक लोकांनी छोटे छोटे व्हिडिओ करून सिनेमाचे रिव्ह्यू टाकले आहेत. डोकेदुखीचा फोटो खूपच व्हायरल झालं आहे. मायग्रेन म्हणजे डोक्याचा कुठला भाग दुखतो.. ताणामुळे किती डोकं दुखतं आणि राधे पाहिल्यानं कसं सगळं डोकं दुखतं असा एक फोटो गेल्या दोन दिवसांपासून खूप व्हायरल झाला आहे. एकवेळ कोरोनाला व्हॅक्सिन मिळेल पण राधेच्या व्हॅक्सिनचं काय करायचं अशा अर्थाचे विनोदही सोशल मीडियात हशा पिकवत आहेत. 


आयएमडीबीमध्ये सलमानच्या चित्रपटाला मिळालेल्या या रेटिंगने शेवटून दुसरा नंबर मिळवला आहे. सलमानच्या रेस चित्रपटाला याहीपेक्षा कमी रेटिग मिळालं होतं. एकिकडे चित्रपट फार बरा नाही असं मत प्रेक्षकांचं आहेच. पण त्याचवेळी दुसरीकडे सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर नेपोटिझम आणि बड्या निर्मात्यांकरवी तरुणाईची होणारी पिळवणूक असं जे वातावरण तयार झालं होतं, त्याचा फटकाही राधेला बसला असण्याची शक्यता आहे. म्हणूनच हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर राधेबद्दल नकारात्मक वातावरण तयार करणारे काही ट्रेंड ट्विटरवर तयार झाले होते. 


हे सगळं एकिकडे चालू असताना रसिकांना हा चित्रपट न आवडल्यान सलमानला चित्रपटाच्या या निकालाची दखल घ्यावी लागेल यात शंका नाही.