'रेस 4' मधून सलमान बाहेर, 'हा' अभिनेता मुख्य भूमिकेत
एबीपी माझा वेब टीम | 12 Jan 2019 07:09 PM (IST)
'रेस 3' च्या अपयशामुळे 'रेस'च्या फ्रेंचायझीमधील आगामी 'रेस 4' चित्रपटामधून सलमानचा पत्ता कट झाला आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानसाठी 2018 हे वर्ष फार चांगलं गेलं नाही. सलमान खान प्रमुख भूमिकेत असलेला 'रेस 3' हा चित्रपट शंभर कोटी क्लबमध्ये समाविष्ट झाला खरा परंतु या चित्रपटाने अपेक्षेइतकी कमाई केली नाही. 'रेस 3' च्या अपयशामुळे 'रेस'च्या फ्रेंचायझीमधील आगामी 'रेस 4' चित्रपटामधून सलमानचा पत्ता कट झाला आहे. सलमान खानच्या जागी या चित्रपटात अभिनेता सैफ अली खानची वर्णी लागली आहे. 'रेस' फ्रेंचायझीच्या निर्मात्यांनी 'रेस 4' ची तयारी सुरु केली आहे. यामध्ये सैफ अली खान प्रमुख भूमिकेत असणार आहे. याआधी सैफ अली खानने 'रेस' आणि 'रेस 2'मध्ये प्रमुख भूमिका साकारली होती. हे दोन्हीही चित्रपट सुपरहिट झाले होते. तरिही 'रेस 3 मध्ये निर्मात्यांनी सलमानला पसंती दिली होती. रेस 3 फ्लॉप झाल्यामुळे आता सलमानच्या जागी पुन्हा सैफला संधी देण्यात येणार असल्याची चर्चा सुरु आहे. सलमान सध्या त्याच्या आगामी 'भारत' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. भारतनंतर तो लगेचच 'दबंग 3'च्या चित्रीकरणाला सुरूवात करणार आहे. त्याचदरम्यान रेस 4 चे चित्रीकरणदेखील सुरु होईल. त्यामुळे या चित्रपटात सैफ अली खान मुख्य भूमिका निभावेल. सलमान खान लवकरच भारत या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्या समोर येणार आहे. यामध्ये सलमानसोबत अभिनेत्री कतरिना कैफ मुख्य भूमिकेत पहायला मिळेल. तसेच या चित्रपटात तब्बू, जॅकी श्रॉफ आणि दिशा पाटनी यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.