अली अब्बास जफरचं दिग्दर्शन असलेल्या 'भारत' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर ट्रेण्डिंगमध्ये नसता, तरच नवल. अल्पावधीतच 'भारत' सिनेमाच्या ट्रेलरला यूट्यूबवर लाखांच्या घरात व्ह्यूज मिळाले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून या सिनेमातील सलमानचे विविध लूक सोशल मीडियावर शेअर केले जात होते. सलमानच्या व्यक्तिरेखेचा 18 वर्षांच्या तरुणापासून 70 वर्षांच्या वृद्धापर्यंतचा प्रवास सिनेमात दिसेल. भारत देशाची बदलती स्थितीही यामध्ये दिसणार आहे.
सलमानसोबत कतरिनाच्या अनोख्या लूकचीही चर्चा आहे. मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही 'भारत'च्या ट्रेलरमध्ये दिसत आहे. सोबतच जॅकी श्रॉफ, सुनिल ग्रोव्हर, सतीश कौशिक, नोरा फतेही हे कलाकारही दिसतील. सलमानसोबतच बहीण अल्विरा खान अग्निहोत्री, मेहुणा अतुल अग्निहोत्री, भूषण कुमारही सिनेमाचे सहनिर्माते आहेत.
ईद-उल-फित्रच्या मुहूर्तावर म्हणजेच 5 जून 2019 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दक्षिण कोरियाई चित्रपट 'ओड टू माय फादर' या चित्रपटाचा हा अधिकृत रिमेक आहे.