Salman Khan House Firing :  बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानच्या (Salman Khan) घरावर गोळीबार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांचा कसून तपास सुरू आहे.  या प्रकरणात आतापर्यंत चारजणांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी दोन आरोपींवर सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडल्याचा आरोप असून इतर दोघांनी या आरोपींना शस्त्र पुरवल्याचा आरोप आहे. आरोपींना गुजरात आणि पंजाबमधून अटक करण्यात आली आहे. आता या आरोपींच्या चौकशीत अनेक धक्कादायक माहिती उघड होत असून  मुंबई पोलीस या प्रकरणातील एक-एक बिंदू जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांकडून आता पाच जणांचा शोध सुरू आहे.


मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या चार आरोपींशिवाय अनमोल बिष्णोई, लॉरेन्स बिष्णोई यांच्याशिवाय आणखी पाच एक्समॅनचा शोध पोलिसांकडून सुरू केला आहे. या पाच मिस्टर एक्स व्यक्तींना कोणी ओळखत नाही. पण, त्यांनीच या गोळीबाराच्या प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 


सूत्रांच्या माहितीनुसारे, गोळीबार करण्यापूर्वी हल्लेखोरांना बिष्णोई गँगकडून एक लाख रुपये देण्यात आले. सुपारीची ही 1 लाखाची रक्कम देण्यासाठी 3 एक्समॅनची मदत घेण्यात आली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, शूटरला कोणत्या खात्यातून पैसे पाठवले गेले हे कोणालाही कळू नये म्हणून शूटरला त्याच्या मित्रांचे खाते क्रमांक दिले गेले आणि त्यानंतर तीन वेगवेगळ्या लोकांनी या खात्यांमध्ये पंजाब, बिहार (पाटणा) मध्ये अल्प प्रमाणात पैसे जमा केले. शेवटी चंदीगड एटीएम वापरून शूटरच्या मित्रांच्या खात्यात थेट पैसे जमा करण्यात आले. 


त्यानंतर शूटरला बंदूक देण्यासाठी आलेल्या सोनूकुमार बिश्नोई आणि अनुजकुमार थापन यांनी ही पिस्तुल आणि गोळ्या काही ‘एक्स मॅन’ने दिले. पिस्तुल आणि गोळ्या पनवेलला आरोपी सागर आणि विकीकडे पोहचवण्याची सूचना त्यांनी करण्यात आली. “एक्स-मेन” कोण आहे हे सोनू आणि अनुजला माहीत नसल्याचे चौकशीत समोर आले आहे. 


आरोपींना लपण्यासाठी दिली जागा.... 


सलमानच्या घरावर गोळीबार केल्यानंतर 'एक्स-मॅन’ ने  सागर आणि विकीला लपण्याची जागा दिली होती. याच ठिकाणाहून आरोपींना अटक करण्यात आली. पण ती व्यक्ती कोण होती, याची कल्पना या दोघांनादेखील नाही. 


एका अधिकाऱ्याने सांगितले की, चौकशी दरम्यान आरोपींनी सांगितले की, गोळीबार केल्यानंतर दोन्ही आरोपी भूजला पोहचले आणि त्यांनी तिथून अनमोल बिष्णोईला याची माहिती दिली. त्याने त्यांचे गुगल लोकेशन मागितले. त्यांनी गुगल लोकेशनवर पाठवल्यानंतर त्याठिकाणी एक व्यक्ती आली आणि त्याने त्यांना लपण्याचे ठिकाण दाखवले. 


मित्रांसमोर गोळ्या चालवल्या....


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडण्याआधी आरोपींनी बिहारच्या चंपारणमध्ये 8 गोळ्या झाडून हल्ल्याचा सराव केला. त्यांनी हा गोळीबार आपल्या मित्रांसमोर केला. त्यामुळे त्यांची दहशत मित्र परिवारामध्ये वाढली आणि हे दोघेही बिष्णोई गँगसाठी काम करत आहेत, हेदेखील त्यांच्या जवळच्या लोकांना समजले. पोलिसांनी आरोपींनी दिलेल्या जबाबाच्या पुष्टीसाठी काही मित्रांची चौकशी दिली. त्यांचेही जबाब नोंदवण्यात आले. 


ऑस्ट्रेलियात आहे अनमोल आणि त्याचा खास मित्र


मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनमोल बिष्णोईचा या प्रकरणात सहभाग होता. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉरेन्सचा भाऊ अनमोल आणि  बिष्णोई गँगचा महत्त्वाचा माणूस रोहित गोदारा हे दोघेही ऑस्ट्रेलियात असून तिथून भारतामधील आपली टोळी चालवत आहेत.  


बिष्णोई गँगकडून आरोपींना कायदेशीर मदतीचे आश्वासन


चौकशी दरम्यान,सागर आणि विकीने चौकशी दरम्यान सांगितले की, त्यांनी बिष्णोई गँगचे त्यांनी काम केले की त्यांना सगळी मदत पुरवली जाईल. या प्रकरणानंतर तुम्ही प्रसिद्ध व्हाल आणि लोकांमध्ये तुमची दहशत निर्माण होईल असे सांगण्यात आले. त्याशिवाय, तुम्हाला अटक झाल्यास सगळी कायदेशीर मदत पुरवली जाईल.