दोन दिवस जेलमध्ये काढावे लागल्याने सलमानसह त्याचे चाहतेही प्रचंड अस्वस्थ होते. पण सलमानला जामीन मिळताच त्याच्या चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. या संपूर्ण प्रकरणानंतर सलमान काय प्रतिक्रिया देतो याकडे त्याच्या चाहत्यांचे लक्ष लागून राहिले होते. पण सलमानने गेले दोन दिवस कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. अखेर आज (सोमवार) त्याने आपली पहिली प्रतिक्रिया ट्विटरवरुन दिली.
'कृतज्ञतेचे अश्रू... त्या सर्व लोकांचे आभार जे माझ्यासोबत होते आणि अजिबात आशा सोडली नाही. तुमच्याकडून मिळणारं प्रेम आणि पाठिंबा यासाठी खूप धन्यवाद' असं ट्वीट सलमानने केलं आहे.
सलमानला 5 वर्षांची शिक्षा
20 वर्षांपूर्वीच्या काळवीट शिकारप्रकरणी दोषी ठरलेल्या अभिनेता सलमान खानला 5 वर्षांची शिक्षा आणि दहा हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. गुरुवारी 5 एप्रिलला जोधपूर सत्र न्यायालयाने सलमानला दोषी ठरवत ही शिक्षा सुनावली. मात्र त्याचे सहकारी अभिनेते सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांना निर्दोष ठरवण्यात आलं. शिक्षेनंतर सलमानची रवानगी जोधपूरच्या सेंट्रल जेलमध्ये करण्यात आली होती. पण नंतर त्याला सेशन कोर्टाकडून जामीनही मंजूर करण्यात आला.
नेमकं प्रकरण काय आहे?
काळवीट शिकार प्रकरण 27 आणि 28 सप्टेंबर 1998 सालचं आहे. सलमान खान दिग्दर्शक सुरज बडजात्या यांच्यासोबत 'हम साथ साथ है' या सिनेमाची शुटिंग जोधपूरमध्ये करत होता. यावेळी 27 सप्टेंबरच्या रात्री तो सहकलाकार सैफअली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांच्यासोबत शिकारीसाठी निघाला.
यावेळी सलमानने संरक्षित वन्य जीवांच्या यादीत असलेल्या दोन काळवीटांची शिकार केल्याचा आरोप आहे. याशिवाय विविध दोन ठिकाणी काळवीटाची शिकार केल्याचाही त्याच्यावर आरोप करण्यात आला. त्यामुळे त्याच्यावर एकूण चार खटले दाखल आहेत.
संबंधित बातम्या