Salman Khan House Firing Case : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) राहत असलेल्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटजवळ गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना 72 तासांच्या आत गुजरातमधील भूज येथून पोलिसांनी अटक केली. आरोपींनी गोळीबार केलेली एक गोळी सलमान खानच्या घरालाच्या भिंतीत घुसली. सलमान खानच्या घराजवळ गोळीबार झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी वेगाने तपासचक्रे फिरवली. पोलिसांच्या तपासात महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
फेब्रुवारी महिन्यात मुंबई गाठली, करारनाम्याशिवाय फ्लॅट भाड्यावर घेतला
आरोपींनी फेब्रुवारी महिन्यात मुंबई गाठली असल्याची माहिती तपासात समोर आली. आरोपींनी मुंबई सेंट्रल येथील एका हॉटेलमध्ये रूम बुक केली आणि त्यानंतर त्यांनी सलमान खानच्या घराची म्हणजेच गॅलेक्सी अपार्टमेंटची रेकी केली होती. त्यानंतर आरोपींनी पनवेल येथील हरिग्राम गावातील राधाकृष्ण सोसायटीत फ्लॅट भाड्याने घेतला.आरोपी रेकी करण्यासाठी पनवेलहून मुंबईत यायचे. आरोपींनी पनवेलमध्ये घर घेताना घराचा करारनामाही केला नव्हता. घर भाड्याने देण्यासाठी आरोपींनी 25 ते 30 हजार रुपयांचा सौदा केला होता. त्याशिवाय आरोपींनी 24 हजार रुपयांना दुचाकी खरेदी केली होती. आरोपीने दुचाकी खरेदी केली तरी त्याची पूर्ण रक्कमही दिली नसल्याचे दुचाकीच्या मालकाने पोलिसांना चौकशी दरम्यान सांगितले.
या प्रकरणात आरोपींना जरी अटक झाली असली तरी गुन्ह्यांत वापरण्यात आलेले शस्त्र पोलिसांना सापडलेलं नाही. मुंबई पोलिसांकडून याचा कसून तपास सुरू आहे. गुन्ह्यात वापरलेलं हत्यार हे मुख्य पुरावा आहे. मात्र, ते अद्याप पोलिसांच्या हाती लागलेलं नाही. गुन्ह्यात वापरलेलं हत्यार हे बॅलेस्टिक रिपोर्टसाठी महत्वाचा पुरावा आहे. त्यामुळे हे शस्त्र हस्तग करण्यासाठी पोलिसांचा तपास वेगाने सुरू आहे.
गोळीबार केल्यानंतर आरोपींनी शस्त्राचे काय केले?
सलमान खान प्रकरणात आरोपींच्या प्राथमिक चौकशीत गुन्ह्यातील हत्यार दोघांनी वांद्रेतच फेकल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र वांद्रेमध्ये हे शस्त्र नेमकं कुठे फेकलं याचा तपास पोलीस आता करत आहेत. या प्रकरणात सध्या या दोघां व्यतिरिक्त तीन जणांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. यात ज्या व्यक्तीकडून आरोपींनी दुचाकी विकत घेतली ती व्यक्ती, ज्या घरात आरोपी भाड्याने रहात होते त्या घरमालकाशी आणि आरोपींना सिमकार्ड मिळवून देणाऱ्यांची चौकशी सध्या सुरू आहे.