नवी दिल्ली : बॉलिवूडचा दबंग भाईजान नेहमी कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत असतो. पण यावेळी तो एका मुलाखतीने चर्चेत आला आहे. या मुलाखतीत त्याने नैराश्याला श्रीमंतांचं दुखणं असल्याचे वक्तव्य केलं होतं. त्याच्या या वक्तव्याने नेटिझन्सनी त्याच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

कोईमोई वेबसाईटच्या वृत्तानुसार, सलमान खान म्हणाला की, “मी अनेकांना सुट्ट्यांमध्ये बाहेर फिरायला जाताना पाहतो. पण माझ्याकडे ही इतका वेळ नाही. मी अनेकांना नैराश्येने ग्रासल्याचे पाहिलं आहे. नैराश्येमध्ये ते अतिशय भावूक असतात, दु: खी असतात. पण माझ्याकडे ती सोय नाही. कारण, मी जर माझ्या मनासारखं वागायचं ठरवलं, तर ते माझ्यावरच उलटेल.”

सलमान पुढे म्हणाला की, “माझा व्यवसायच आहे की, मला प्रत्येक वेळी चांगलं राहणं गरजेचं असतं. चांगले कपडे परिधान करणं, स्टायलिश अॅक्शन सीन्स आणि रोमन्स करावा लागतो. कधी कधीतर अनेक सौंदर्यवतींसोबत माझ्या अफेअरच्या चर्चा सुरु असतात. तर कधी अचानक कोर्टाची तारीख समोर येऊन ठेपते.”

सलमानच्या या वक्तव्याचा सर्वत्र तीव्र विरोध होत आहे. विशेष म्हणजे, यावरुन अभिनेत्री दीपिका पादुकोणनेही आपलं मत व्यक्त केलं आहे. दीपिका म्हणाली की, “नैराश्य कुणालाही येऊ शकतं. तो सार्वजनिक जीवनातील व्यक्ती असू दे, किंवा आर्थिक जगाताशी संबंधित व्यक्ती. डिप्रेशनकडे श्रीमंतांचं दुखणं म्हणून पाहिलं जातं. अनेकांना वाटतं की, श्रीमंत व्यक्तीच नैराश्येने ग्रासल्या असतात. कारण, त्यांच्याकडे पैसा आणि वेळ दोन्ही आहे. पण हे एक मिथक आहे.”

सलमानच्या वक्तव्यावर ट्विटरवरुनही टीका होत आहे. त्यातील काही प्रमुख टीका पुढील प्रमाणे