मुख्यमंत्र्यांचा प्रश्न
या भेटीदरम्यान डॅशिंग आर्चीला मुख्यमंत्र्यांनी पहिलाच प्रश्न विचारला तो म्हणजे, तू बुलेटवरुन आलीस का? या प्रश्नानंतर 'वर्षा'वरील वातावरण अक्षरश: सैराटमय झालं.
मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना रिंकू म्हणाली, "मी बुलेटवरुन नाही, गाडीतून आले".
"मुख्यमंत्र्यांशी कधी भेट होईल, हे वाटलंच नव्हतं, पण 'सैराट'मुळे भेट झाली. सैराटच्या यशामुळे खूप छान वाटतंय", असं रिंकू म्हणाली.
तर संपूर्ण टीमने घेतलेल्या मेहनतीचं फळ म्हणजे सैराटचं यश आहे, असं परशा अर्थात आकाश ठोसर म्हणाला.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण टीमचं भरभरुन कौतुक केलं. तसंच 'वर्षा' बंगल्यावरील अनेक कर्मचाऱ्यांनीही आर्ची आणि परशासोबत फोटोसेशन केलं.
याप्रसंगी मुख्यमंत्र्यांसह गृहराज्य मंत्री राम शिंदे, आमदार शिवाजी कर्डिले उपस्थित होते. तर 'सैराट'कडून दिग्दर्शक नागराज मंजुळे, निखिल साने आदी उपस्थित होते.
मराठीतील सर्वाधिक कमाई करणारा 'सैराट'
सैराट हा मराठीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 'सैराट'नं अवघ्या 11 दिवसात तब्बल 41 कोटीची कमाई केली आहे. सैराटच्या या रेकॉर्डब्रेक कमाईनं 'नटसम्राट'लाही मागं टाकलंय.