Saif Ali Khan Case Update : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. घटना होऊन दोन दिवस उलटून गेले असले तरी आरोपी सापडलेला नाही. फरार हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी आता नवा प्लॅन आखला आहे. फरार आरोपीला पकडण्यासाठी आता पोलिस मोबाईल लोकेशनची मदत घेणार आहेत.


हल्लेखोराला पकडण्यासाठी मुंबई पोलिसांचा नवा प्लॅन


सैफ अली खान हल्ला प्रकरणात हल्लेखोराला आता मोबाईल लोकेशन आणि सीडीआर यांच्या आधारे शोधण्यात येणार आहे. त्या रात्रीचे इमारत परिसरातील टाॅवर लोकेशन आणि आरोपी कोणाशी बोलला आहे का, याची माहिती पोलिस काढत आहेत. त्या वेळी किती मोबाइल अॅक्टीव्ह होते. त्या आधारावर त्या सुरू असलेल्या नंबरचा सीडीआरही काढला जात आहे. 


आरोपीचं मोबाईल लोकेशन ट्रेस करणार


वांद्रे येथील एका सीसीटिव्हीत आरोपी फोनवर बोलत जाताना पोलिसांना आढळून आला आहे. ज्यावेळी तो फोनवर बोलत आहे, त्या ठिकाणचं लोकेशन आणि अॅक्टीव नंबरद्वारे पोलिस त्याचं लोकेशन शोधण्याच्या प्रयत्नात आहे.


सैफ अली खान धोक्याबाहेर आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी 35 टीम तयार केल्या आहे. शुक्रवारी आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले, ज्यामध्ये एक संशयित इमारतीतून पायऱ्यांवरून पळून जाताना दिसत होता. या प्रकरणात पोलिसांना पहिले यश मिळाले आहे आणि एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.


गुरुवारी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास अभिनेता सैफ अली खानवर एका अज्ञात व्यक्तीने हल्ला केला. पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपी चोरीच्या उद्देशाने घरात घुसल्याचे समोर आले आहे. सैफच्या घरातील मोलकरणीने पोलिसांना सांगितले की, हल्लेखोराने 1 कोटी रुपयांची मागणी केली होती. 


सैफ अली खानवरील हल्ल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज सापडलं आहे, ज्यामध्ये संशयित इमारतीतून पळून जाताना दिसत आहे. या प्रकरणात, मुंबईत पोलिसांनी एका अज्ञात संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.