Saif Ali Khan Case Latest Update : अभिनेता सैफ अली खान याच्या घरात चोरीच्या प्रयत्नात शिरलेल्या व्यक्तीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला केलेला हा आरोपी गेल्या 3 दिवसांपासून लपून पळत होता. त्याला पकडण्यात पोलिसांना अखेर यश आलं आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यातील कासारवडवली येथे अनेक कन्स्टक्शन साईट्स आहेत, तेथील कामगार लेबर कॅम्पमध्ये राहतात.
आरोपीला 'असं' पकडलं
लेबर कॅम्पचा हा जंगल परिसर आहे. या परिसरात जाऊन हा गवताच्या खाली लपण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, पोलिसांनी त्याला शोधलं. यानंतर पोलिस पकडायला येताच त्याने आरडाओरडा केली. देह यष्टी मजबूत असल्याने त्याने अंगातील ताकद दाखवली. यानंतर चार ते पाच पोलिसांची ताकद त्याच्या मुसक्या आवळण्यास लागली. अखेर पोलिसांनी आरोपीला अटक केली.
हल्लेखोर बांगलादेशी घुसखोर असल्याची माहिती
सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद हा मूळचा झलोकाठी बांगलादेशचा रहिवासी आहे. तो या लेबर कॅम्प परिसरात लपायला आला होता. या अगोदर त्याने इथे लेबर म्हणून काम केलं असल्याने त्याला इथे राहता आणि लपता येईल अशी शाश्वती होती. त्यामुळे त्याने लपण्यासाठी ही जागा शोधली. जिथे हा कॅम्प आहे, तिथेही मोठ्या प्रमाणात बांगलादेशी राहतात, काम करतात. लेबर म्हणून अश्या प्रकारे मोठ्या प्रमाणात काम करीत असल्याचे इथल्या कामगारांनी सांगितलं.
या टीमने आरोपीला पकडलं
लोकेशन मिळाल्यानंतर विक्रोळी पोलीस ठाण्याचे पीएसआय विठ्ठल गायकवाड, शिपाई सावकारे, कोळेकर या टीमने आरोपीला स्पॉटवर शोधला आणि डीसीपी ढवळे यांना कळवलं आणि अटक केली. हल्ला करुन सैफच्या घरातून पळ काढल्यानंतर तो वांद्रे, दादर असा होत, नंतर ठाण्यात पोहोचला. पोलिस पकडण्याची भीती वाटत असल्याने तो प्रचंड मानसिक तणाव आणि चिंतेत होता. यामुळे तो ठाण्यातील घरी लपून होता, अशी माहती समोर आली. त्यानंतर त्याचं मोबाईल लोकेशन ट्रेस झाल्यानंतर ठाण्यातील कासारवडवली येथून आरोपीला अटक करण्यात आली.
आरोपीला लेबर कॅम्पमधून अटक
पोलिसांनी आरोपीला ठाण्यातील कासारवडवली येथील लेबर कॅम्पमधून अटक केली. यानंतर पोलिसांना आरोपीचा फोन लेबर कॅम्पमधील एका खोलीत सापडला आहे. आरोपी मोहम्मद फोन लेबर कॅम्पमधील खोलीतच ठेवून त्याच्या पाठीमागच्या जंगलात लपला होता. जीपे ट्रांजेक्शनमुळे आरोपीचा मोबाईल नंबर सापडल्याने पोलीस मोबाईल लोकेशन शोधत लेबर कॅम्पमध्ये पोहोचले. तिथे पोहोचल्यावर खोलीतील इतर सदस्यांनी आरोपी जंगलाच्या दिशेने लपण्यासाठी गेल्याचे सांगितले. पोलिसानी जंगल परिसरात आरोपीचा शोध घेतला आणि आरोपीला ताब्यात घेतलं.
घटनास्थळावरून एक चाकूचा तुकडा सापडला
पोलिसांनी सांगितलं की, आम्हाला घटनास्थळावरून एक चाकूचा तुकडा सापडला. सैफच्या शरीरातून काढलेला चाकूचा दुसरा तुकडा आम्ही लीलावती रुग्णालयातून ताब्यात घेतला आहे. आरोपीला पकडल्यानंतर तो बांगलादेशी असल्याचं समोर आलं. आरोपीने सैफवर हल्ला केला, त्या चाकूचे तीन तुकडे झाले. ते तुकडे सापडले आहेत. आरोपीने घटनेच्या वेळी घातलेले कपडे त्याने कुठेतरी लपवून ठेवले आहेत. आरोपीचा रक्त नमुना घेण्याची गरज आहे. ज्यावेळी आरोपीने हल्ला केला, त्यावेळी त्याच्या शरीरावरही रक्त लागले असेल, आपल्याला ते कापड जप्त करावे लागेल आणि ब्लड सँपलची तपासणी करावी लागेल.
7 वर्षांपासून भारतात अवैध वास्तव्य
न्यायालयाने आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सरकारी वकिलांनी असंही म्हटलं की, आंतरराष्ट्रीय कट आहे, का याची चौकशी करावी लागेल. पोलिसांनी न्यायालयाला माहिती दिली की, आरोपी 7 वर्षांपासून मुंबईत राहत होता. आरोपी मोहम्मद बांगलादेशी घुसखोर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपी हा मूळचा बांग्लादेशच्या झलोकाठी, नालासिटी येथील राजा बरिया गावचा आहे. तो गेली 7 वर्षे अवैधरित्या भारतात वास्तव्य करत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :