मुंबई : अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan Attack) त्याच्या राहत्या घरी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सैफ चांगलाच जखमी झाला. सध्या त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे हा हल्ला करणारा आरोपीही पोलिसांनी पकडला असून त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी मुंबई पोलीस पूर्ण ताकदीनीशी करत आहेत. त्यामुळेच या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. असे असतानाच आता नवी आणि मोठी माहिती समोर आली आहे. पोलीस सैफ अली खानवरील हल्ल्याच्या क्षण रिक्रिएट करण्याची शक्यता आहे.
आरोपी पुन्हा सैफ अली खानच्या घरात शिरणार?
मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पोलीस या प्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याला पुन्हा एकदा सैफ अली खानच्या घरात घेऊन जाऊ शकतात. त्या ठिकाणी जाऊन पोलीस शहजाद याच्याकडून हल्ल्याचा सिन रिक्रिएट करून घेण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास हल्लेखोर पुन्हा एकदा सैफ अली खानच्या घरात जाणार आहे. तसेच हल्ला कसा केला हे सांगणार आहे.
क्राईम सीन पुन्हा रिक्रिएट केला जाणार?
सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या शहजादला ठाण्यातून बेड्या ठोकण्यात आल्या. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. आता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे या काळात पोलीस त्याच्याशी वेगवेगळी माहिती विचारत आहेत. याच प्रकरणाच्या चौकशीचा एक भाग म्हणून सैफवरील हल्ल्याचे दृश्य पुन्हा एकदा रिक्रिएट केले जाऊ शकते. असे केल्यास हल्ला प्रकरणातील अनेक अनुत्तरीत प्रश्नांचा पोलिसांना छडा लागू शकतो.
सोमवारी सैफ अली खानला डिस्चार्ज?
सूत्रांच्या माहितीनुसार हल्ल्याच्या रिक्रिएशन सोमवारीच केले जाऊ शकते. हल्ला करणारा हा आरोपी बांगलादेशी आहे. तर सैफ अली खानला सोमवारी लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो. सोमवारी त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर सध्या त्याची प्रकृती कशी आहे, याचा आढावा घेतील. त्यानंतर सर्व बाबींचा विचार करून योग्य असल्यास सैफ अली खानला डिस्जार्ज दिला जाऊल. पोलिसांनी अद्याप सैफ अली खानचा जबाब घेतलेला नाही. त्याला डिस्चार्ज मिळाल्यानंतर पोलीस त्याचा जबाब घेऊ शकतात.
हेही वाचा :
'आशिकी'तल्या राहुलने तरुणाईला प्रेम शिकवलं, पण नंतर बॉलिवुडमधून गायब; 'हा' अभिनेता नेमका कुठे गेला?