S. D. Burman Birth Anniversary : हिंदी संगीत आणि चित्रपटसृष्टीत अनेक गायक आणि संगीतकारांनी योगदान दिले आहे. काही स्टार्सनी अशी छाप सोडली की, काळ बदलला पण त्यांची जादू आजही कमी झालेली नाही. असेच एक नाव म्हणजे संगीतकार सचिन देव बर्मन (Sachin Dev Burman). सचिन देव बर्मन यांना आजही लोक एस.डी. बर्मन (S. D. Burman) म्हणूनच ओळखतात. भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांचे योगदान कोणीही नाकारू शकत नाही. एसडी बर्मन हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक आणि संगीतकार होते. आपल्या आवाजासोबतच संगीतानेही त्यांनी आपल्या काळात खूप प्रसिद्धी मिळवली.


एसडी बर्मन यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1906 रोजी त्रिपुरामध्ये झाला. त्यांचे वडील त्रिपुराचे राजे इशानचंद्र देव बर्मन यांचे दुसरे पुत्र होते. त्यांना नऊ भावंडे होती. त्यावेळच्या कलकत्ता विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर एस. डी. बर्मन यांनी संगीताच्या दुनियेत प्रवेश केला. मात्र, संगीताची आवड त्यांना लहानपणापासूनच होती. एक राजा असण्यासोबतच बर्मन दा यांचे वडील सुप्रसिद्ध सितार वादक आणि धृपद गायक देखील होते. संगीतातील बारकावे एसडी बर्मन यांनी आपल्या वडिलांकडून शिकून घेतले होते.


शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले


एसडी बर्मन यांनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले होते. बॉलिवूड संगीत हे शास्त्रीय संगीताचे कौशल्य दाखवण्याचे माध्यम नाही, असे त्यांना वाटायचे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एस.डी. बर्मन कधीच त्यांच्या सुरांची पुनरावृत्ती करत नसत. एस. डी. बर्मन संगीतप्रेमींमध्ये अनेक नावांनी ओळखले जात होते. मुंबईत त्यांना 'बर्मन दा' आणि बांगलादेशात 'शोचिन देब बोरमॉन', बॉलिवूड संगीतकारांमध्ये 'बर्मन दा' आणि चाहत्यांमध्ये एसडी बर्मन आणि 'जीन्स' म्हणून ओळखले जात होते.


एस. डी. बर्मन यांची कारकीर्द


100हून अधिक चित्रपटांना संगीत देणाऱ्या एस डी बर्मन यांनी 13 बंगाली चित्रपटांत गाणी गायली, तर हिंदीतील 14 गाण्यांना आपला मधुर आवाज दिला. 'गाईड' चित्रपटातील गाणे ‘वहाँ कौन है तेरा.. मुसाफिर.. जायेगा कहां को’ला जेव्हा एस डी बर्मन यांनी संगीत आणि आवाज दिला, तेव्हा ऐकणारे श्रोते देखील थक्क झाले. ‘सर जो तेरा चकराए या दिल डूबा जाए’ हे त्यांचे गाणे आजही लोकप्रिय आहे. संगीतप्रेमींनी त्यांना खूप प्रेम दिलं. एस डी बर्मन यांनी अनेक पुरस्कारांवर आपले नाव कोरले होते. 1958 मध्ये त्यांनी 'संगीत नाटक अकादमी' पुरस्कार जिंकला. एस. डी. बर्मन यांना संगीतातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी 1969मध्ये 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. इतकेच नाही तर, एस. डी. बर्मन यांना दोनदा राष्ट्रीय पुरस्कार आणि दोन फिल्मफेअर पुरस्कारही मिळाले होते.


हेही वाचा :


Entertainment News Live Updates 1 October : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!