Rujuta Deshmukh : मराठमोळी अभिनेत्री ऋजुता देशमुख (Rujuta Deshmukh) सध्या चर्चेत आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरवर प्रवास करताना अभिनेत्रीकडून जास्त टोल आकारण्यात आला आहे. आता अभिनेत्रीची खरचं लूट झाली आहे की खरंच असा नियम आहे? आणि असला तर तो बरोबर आहे का? असा प्रश्न तिने नितीन गडकरींना (Nitin Gadkari) टॅग करत चाहत्यांना विचारला आहे.


ऋजुता देशमुख म्हणाली,"आताच मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आलेला अनुभव मला तुम्हाला सांगायचा आहे. माझं माहेर पुण्याचं पण मुंबईला येऊन आता मला 25 वर्ष झाली आहेत. त्यामुळे आता मी मुंबईचीच झाली आहे. पण पुण्यात आई-वडील असतात.. सासू-सासरे असतात. त्यामुळे माझं पुणे-मुंबई येणं-जाणं खूप जास्त आहे". 


ऋजुता घडलेला प्रसंग चाहत्यांसोबत शेअर करत म्हणाली,"31 जुलैला मी पुण्याला गाडी घेऊन गेले होते. प्रत्येकवेळेला गाडी घेऊन जात नाही. पण यावेळेला गाडी घेऊन गेले. जेव्हा मी गाडी घेऊन जात असते तेव्हा माझं कुटुंब माझ्यासोबत असतं. त्यावेळी आम्ही लोणावळ्यात जात असतो. खालापूरला 240 आणि तळेगावला 80 रुपये टोल घेतला जातो. पण यावेळी पुण्याला घरी पोहोचल्यावर माझ्या लक्षात आलं की 240 आणि 240 असे डिडक्ट झाले आहेत. त्यानंतर मी त्यांच्याकडे मेल करत तक्रार नोंदवली. दुसऱ्या दिवशी मी मॅनेजरसोबत बोलले घडलेला प्रकार त्यांना सांगितला. त्यानंतर पहिला प्रश्न त्यांनी मला विचारला की,तुम्ही लोणावळ्यात उतरला होतात का? हो.. मी दरवेळेला लोणावळ्यात उतरत असते. त्यावर ते म्हणाले की,"आता दोन भाग झाले आहेत मुंबई ते लोणावळा 240  आणि लोणावळा ते पुणे 240 रुपये. जेव्हापासून फॅशटॅग सुरू झालं तेव्हापासूनच हे सुरू झालं आहे". 






अधिकाऱ्यांना उत्तर देत ऋजुता पुढे म्हणाली,"फॅशटॅग सुरू झाल्यानंतरही मी अनेकदा पुणे-मुंबई प्रवास केला आहे. पण यावेळीच असं का झालं याचं त्यांच्याकडे उत्तर नव्हतं. मुळात मुंबई ते लोणावळा हे अंतर जास्त आहे आणि लोणावळा ते पुणे हे अंतर कमी आहे. अंतर वेगवेगळं असताना अशा प्रकारचा टोल आकारणं योग्य आहे का? तुम्हाला काय वाटतं? असा प्रश्न तिने चाहत्यांना विचारला आहे". 


ऋजुता देशमुखने व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे,"तुम्हाला काय वाटतं??? अश्या अनेक गोष्टी घडतात आणि आपण किंवा मी गप्प बसते... कारण परिणाम होईल याची खात्री नसते. या वेळी मनात आलं, बोलून बघूया!! खरंच असा नियम आहे का? आणि असला तर तो बरोबर आहे का?". ऋजुताने नितीन गडकरींना टॅग करत चाहत्यांना हा प्रश्न विचारला आहे. त्यावर नियम असाच आहे, लूट सुरू आहे, असे चाहते म्हणाले आहेत. 


यापूर्वी अभिनेते मिलिंद दास्ताने यांनाही असा अनुभव आला होता. तुझ्यात जीव रंगला फेम मिलिंद दास्ताने यांनी एबीपी माझाला सांगितले होते की,  'काही कामानिमित्त मी मुंबईहून पुण्याला गेलो होतो. त्यावेळी आधी खालापूर टोल नाक्यावर फास्ट टॅगमधून 203 रुपये आणि पुढे तळेगाव टोल नाक्यावर 67 रुपये असे 270 रुपये कापले गेले. याबद्दल आक्षेप नाही. काम आटोपून पुण्याहून मुंबईला परतत असताना तळेगाव टोलनाक्यावर 203 रुपये कापले गेले. त्यानंतर येणाऱ्या टोलवर 67 रुपये कापले जाणार याचा हिशेब करता तेवढे पैसे माझ्या फास्ट टॅग अकाऊंटमध्ये होते. तळेगावचा टोल देऊन पुढे येताना आम्ही लोणावळ्यात खाली उतरून ब्रेक घ्यायचं ठरवलं. थोडं थांबून आम्ही लोणावळ्यातून मुंबईच्या दिशेने बाहेर पडताना येणाऱ्या टोलवर आमचे 135 रुपये फास्ट टॅगमधून कट झाले. तिथून आम्ही एक्स्प्रेस वेला लागलो. त्यावेळी माझ्या फास्ट टॅग अकाऊंटमधला बॅलन्स कमी असल्याचं सांगण्यात आलं आणि पुन्हा 203 रुपये घेण्यात आले. हा संतापजनक प्रकार आहे. खरंतर एका ट्रीपमध्ये 270 रुपयांचा टोल पडायला हवा. पण या पुण्यातून मुंबईत येता येता माझे आधी 203.. मग 135 असे पैसे कट झाल्याने पुढे बॅलन्स कमी झाला ही लूट आहे.'


संबंधित बातम्या


मुंबई-पुणे प्रवासादरम्यान लोणावळ्यात थांबताय? अभिनेते मिलिंद दास्ताने यांचा अनुभव वाचा