मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे झाल्यापासून मुंबई पुणे किंवा पुणे मुंबई प्रवास करणाऱ्यांची चांगलीच सोय झाली. अवघ्या काही तासांत मुंबईहून पुणे वा पुण्याहून मुंबई गाठता येत असल्याने या एक्स्प्रेस वेवर गर्दी वाढली. हा प्रवास साधारण साडेतीन-चार तासांचा होतो. म्हणून अनेक जण या प्रवासादरम्यान एक छोटा ब्रेक घेतात. हा ब्रेक बऱ्याचदा एक्स्प्रेस वेवरच फूड मॉलच्या ठिकाणी घेतला जातो. तर अनेक मंडळी या प्रवासाच्या बरोबरमध्ये येणाऱ्या लोणावळ्यात ब्रेक घेतात. पण आता या मार्गावरून लोणावळ्यात उतरणार असाल तर त्याआधी थोडा विचार करायला लागणार आहे. कारण, एक नवाच नियम अस्तित्वात आला आहे. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील राणादाचे वडील अर्थात अभिनेते मिलिंद दास्ताने यांनी हा अनुभव एबीपी माझाला सांगितला आहे.
मिलिंद दास्ताने यांना आलेल्या अनुभवाबद्दल बोलताना ते म्हणाले, 'काही कामानिमित्त मी मुंबईहून पुण्याला गेलो होतो. त्यावेळी आधी खालापूर टोल नाक्यावर फास्ट टॅगमधून 203 रुपये आणि पुढे तळेगाव टोल नाक्यावर 67 रुपये असे 270 रुपये कापले गेले. याबद्दल आक्षेप नाही. काम आटोपून पुण्याहून मुंबईला परतत असताना तळेगाव टोलनाक्यावर 203 रुपये कापले गेले. त्यानंतर येणाऱ्या टोलवर 67 रुपये कापले जाणार याचा हिशेब करता तेवढे पैसे माझ्या फास्ट टॅग अकाऊंटमध्ये होते. तळेगावचा टोल देऊन पुढे येताना आम्ही लोणावळ्यात खाली उतरून ब्रेक घ्यायचं ठरवलं. थोडं थांबून आम्ही लोणावळ्यातून मुंबईच्या दिशेने बाहेर पडताना येणाऱ्या टोलवर आमचे 135 रुपये फास्ट टॅगमधून कट झाले. तिथून आम्ही एक्स्प्रेस वेला लागलो. त्यावेळी माझ्या फास्ट टॅग अकाऊंटमधला बॅलन्स कमी असल्याचं सांगण्यात आलं आणि पुन्हा 203 रुपये घेण्यात आले. हा संतापजनक प्रकार आहे. खरंतर एका ट्रीपमध्ये 270 रुपयांचा टोल पडायला हवा. पण या पुण्यातून मुंबईत येता येता माझे आधी 203.. मग 135 असे पैसे कट झाल्याने पुढे बॅलन्स कमी झाला ही लूट आहे.'
दास्ताने यांनी खालापूर टोल नाक्यावर याबद्दल जाबही विचारला. दास्ताने म्हणाले, 'मी तिथल्या टोलवर असलेल्या लोकांना याबाबत विचारलं. तर गेल्या 10 दिवसांपासून हा नवा नियम आल्याचं सांगण्यात आलं. ही लूटच आहे. केवळ लोणावळ्यात तासभर उतरलो म्हणून एक्सप्रेस वे चा आधी काढलेला टोलच रद्द करणं याला अर्थच नाही. याबद्दल तिथल्या तक्रार बुकात मी रीतसर लेखी तक्रार नोंदवून आलो आहे. मुंबई-पुणे प्रवासादरम्यान अनेक लोक नाश्त्याला लोणावळ्यात उतरतात. तासभर थाबून पुन्हा प्रवासाला निघतात. अशावेळी त्यांच्याकडून 135 रुपयांचा टोल घेणे आणि पुन्हा एक्सप्रेस वेवर 203 रुपयांचा टोल घेणे अन्यायकारक आहे.'
दास्ताने यांनी याबाबत एक व्हिडिओ करूनही दाद मागितली आहे. लोणावळ्यात उतरल्याने एक्स्प्रेस वेवरचा टोल रद्द होण्याचा प्रकार घडल्याने प्रवासी नागरिकांनी याची नोंद घेऊन जागरुक राहावं असं आवाहनही दास्ताने यांनी केलं आहे.