RSS Leader Withdrawed Case Against Javed Akhtar: बॉलीवूड (Bollywood Movies) चित्रपटांसाठी अनेक गाणी लिहिणारे गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांना आरएसएसची (RSS) तालिबानशी (Taliban) तुलना करण्याच्या प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. या बदनामी प्रकरणातील तक्रारदार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित वकिलांनी न्यायालयात दाखल केलेली तक्रार मागे घेतली आहे. या समेटनंतर न्यायालयानं हा खटला रद्द करून जावेद अख्तर यांची निर्दोष मुक्तता केली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यावरुन ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. 2021 मध्ये एका वकिलानं मुलुंड दंडाधिकारी न्यायालयात दाखल केलेल्या फौजदारी तक्रारीतून अख्तर यांना दिलासा मिळाला आहे. संतोष दुबे नामक तक्रारदारानं काही दिवसांपूर्वी आपण ही तक्रार मागे घेऊ इच्छित असल्याचं कोर्टाला कळवलं होतं. त्यानुसार दोन्ही बाजूंनी हे प्रकरण सामंजस्यानं मिटवलं जात असल्याची नोंद करत दंडाधिकारी कोर्टानं या प्रकरणी जावेद अख्तर यांची निर्दोष मुक्तता केली आहे.
2022 मध्ये न्यायालयानं बजावलेलं समन्स
जावेद अख्तर यांना पाठवलेल्या नोटीसमध्ये वकील संतोष दुबे यांनी जावेद अख्तर यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंदवण्याची धमकी दिली होती. वकिलांनी सांगितलेलं की, गीतकार जावेद अख्तर यांच्याकडून ते 100 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी करतील आणि त्यांची सर्व वक्तव्य मागे घेण्यासाठीही सांगतील. मात्र, जावेद अख्तर यांनी तसं न केल्यानं वकील संतोष दुबे यांनी मुलुंड दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली. त्यावेळी, न्यायालयानं 2022 मध्ये प्रक्रिया सुरू करून जावेद अख्तर यांना समन्स बजावलं होतं.
प्रकरण नेमकं काय?
तालिबानमधील सत्तांतरानंतर जगभरात त्याचे प्रतिसाद आणि प्रतिक्रिया उमटत असताना अख्तर यांनी एका वृत्तवाहिनीला यासंदर्भात मत व्यक्त करताना आरएसएसचा उल्लेख करत तालिबानची तुलना आरएसएसबरोबर केली. संघाची विचारसरणी तालिबानींसारखी आहे, आरएसएस लोकांची दिशाभूल करते, त्यांचे मानसिक खच्चीकरण असल्याचंही अख्तर यांनी म्हटलं होतं. यामुळे संघाची प्रतिमा जनमानसात मलिन झाली असल्याचा आरोप करत आरएसएस समर्थक ॲड. संतोष दुबे यांनी मुलुंड येथील दंडाधिकारी न्यायालयात अख्तर यांच्याविरोधात कलम 499(मानहानी), 500(बदनामी अंतर्गत शिक्षा) फौजदारी तक्रार दाखल केली आहे. अख्तर यांनी राजकीय हेतूने आरएसएसच्या नावाचा अनावश्यकपणे वापर केला असल्याचंही दुबे यांनी आपल्या तक्रारीत म्हटलेलं होतं. आरएसएस आणि तालिबान्यांची विचारधारा, तत्त्वज्ञान, मानसिकता आणि कार्यपद्धतीमध्ये कोणत्याही प्रकारे साम्य नाही. परंतु, आरएसएसची प्रतिष्ठा खराब करणे, नुकसान हेतूने, हेतुपुरस्सर बदनामीकारक काल्पनिक विधाने केली असल्याचंही दुबे यांनी म्हटलेलं होतं.