Ray Stevenson Death : एस. एस. राजामौलींच्या (S. S. Rajamouli) ऑस्कर विजेत्या 'आरआरआर' (RRR) सिनेमातील अभिनेते रे स्टीवेन्सन (Ray Stevenson) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. रे स्टीवेन्सन यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
'आरआरआर'च्या माध्यमातून स्टीवेन्सन यांना भारतात मिळालेली लोकप्रियता
रे स्टीवेन्सन हे लोकप्रिय अभिनेते असून 'आरआरआर' (RRR) या सिनेमाच्या माध्यमातून त्यांना भारतात चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. 'आरआरआर' या सिनेमात रे स्टीवेन्सन खलनायकाच्या भूमिकेत होते. या सिनेमात त्यांनी स्कॉट बक्सटनची भूमिका साकारली होती. त्यांची ही नकारात्मक भूमिका भारतीय सिनेरसिकांच्या पसंतीस उतरली होती. रे स्टीवेन्सन यांचा 'आरआरआर' हा पहिलाच भारतीय सिनेमा आहे.
एस. एस. राजामौलींकडून शोक व्यक्त
'आरआरआर' या सिनेमाचे दिग्दर्शक एस.एस. राजामौली (S. S. Rajamouli) यांनी ट्वीट करत रे स्टीवेन्सन यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी 'आरआरआर' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचा रे स्टीवेन्सन यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत रे स्टीवेन्सन आणि एस. एस. राजामौली सिनेमासंदर्भात चर्चा करताना दिसत आहेत. हा फोटो शेअर करत राजामौलींनी लिहिलं आहे,"धक्कादायक... रे स्टीवेन्सन यांचं निधन झालं आहे यावर विश्वास बसत नाही. रे स्टीवेन्सन यांचं दिलखुलास व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना खूप मजा आली".
रे स्टीवेन्सन यांच्याबद्दल जाणून घ्या (Who Is Ray Stevenson)
25 मे 1964 रोजी जन्मलेल्या रे स्टीवेन्सन वयाच्या आठव्या वर्षी लंडनला गेले. लंडनमधील ब्रिस्टल ओल्ड विक थिएटर स्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं आहे. नव्वदच्या दशकात त्यांनी सिनेमे आणि मालिकांमध्ये काम करायला सुरुवात केली. पण 1998 साली प्रदर्शित झालेल्या 'द थ्योरी ऑफ फ्लाइट' या सिनेमाच्या माध्यमातून त्यांना चांगलीच लोकप्रियता मिळाली. या सिनेमात त्याने हेलेना बोनहम कार्टरचं पात्र साकारलं होतं. 'पुनीशर: वॉर जोन', 'थॉर' आणि 'किल द आयरिशमॅन' या सिनेमांच्या माध्यमातून रे स्टीवेन्सन यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.
'आरआरआर' या सिनेमानंतर रे स्टीवेन्सन यांनी 'अॅक्सीडेंट मॅन : हिटमॅन हॉलिडे' या सिनेमात काम केलं आहे. '1242: गेटवे टू द वेस्ट' या सिनेमासाठी त्यांना नुकतीच विचारणा झाली असून या सिनेमासाठी त्यांनी होकार दिला होता. ‘थॉर’च्या सीक्वेलमध्ये ‘थॉर: द डार्क वर्ल्ड’मध्येही रे स्टीवेन्सन झळकले आहेत. या सिनेमात त्यांनी वोल्सटॅगचं पात्र साकारलं होतं.
संबंधित बातम्या