मुंबई : शाहरुख खानच्या बहुचर्चित झिरो चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या ट्रेलरची समाज माध्यमांमध्ये चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटाकडून शाहरुखलादेखील मोठ्या अपेक्षा आहेत. शिवाय शाहरुखने गेल्या दोन वर्षांमध्ये त्याच्या नावाला साजेसा मोठा चित्रपट दिलेला नसल्याने त्याने 'झिरो'वर लक्ष केंद्रीत केलं आहे. परंतु या चित्रपटाला मोठ्या क्लॅशपासून वाचवण्याची कामगिरी केली आहे ती मराठमोळ्या रितेश देशमुखने. त्यामुळे भावूक झालेल्या शाहरुखने रितेशचे आभार मानले आहेत.


किंग खानच्या झिरो या चित्रपटासाठी रितेशने त्याच्या ‘माऊली’ या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. दिलदार रितेशचा हा मोठेपणा पाहून शाहरुखलाही बरे वाटले. त्याने त्याच्या अधिकृत ट्विटरवरुन रितेशचे आभार मानले आहे. या ट्विटमध्ये शाहरुखने लिहिले आहे की, ‘आज लहान भाऊ खूप मोठा झाला. तू दाखवलेला मनाचा मोठेपणा, मला दिलेला आदर याबद्दल मी काय बोलणार. माझ्यासाठी तू तुझी गरज बाजूला ठेवलीस, हे पाहुन मी भारवलो आहे. तुझ्यासारखा मित्र मला मिळाला, याचा मला आनंद आहे,’


आनंद एल. राय यांनी दिग्दर्शित केलेला झिरो हा चित्रपट येत्या २१ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये शाहरुखसह कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. २१ डिसेंबर रोजी रितेशचा बहुप्रतिक्षीत ‘माऊली’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित होणार होता. दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले असते तर ‘झिरो’ या चित्रपटाला मोठे नुकसान सोसावे लागले असते. त्यामुळे झिरोचे निर्माते चिंतेत होते. रितेश देशमुखचे महाराष्ट्रात बहुसंख्य चाहते आहेत. ‘माऊली’ आणि ‘झिरो’ एकाच दिवशी प्रदर्शित झाले तर झिरोला मोठे नुकसान झाले असते. रितेशने ‘माऊली’च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलल्याने शाहरुखला मोठा दिलासा मिळाला आहे.