मुंबई : रवी जाधव दिग्दर्शित आगामी 'बँजो' चित्रपटासाठी बॉलिवूडचा मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख झोकून देऊन काम करत आहे. चित्रपटाच्या पहिल्या सीनसाठी रितेश चक्क गटारात उतरल्याचं 'मुंबई मिरर'च्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

 
'रिअल लोकेशन्सला शूट केल्यामुळे सिनेमाला एक वेगळं वलय मिळतं. बँजो सिनेमाही याला अपवाद नाही. मी गटारातून एन्ट्रीची कल्पना रितेशला ऐकवली, तेव्हा त्याने कुठलीही हरकत घेतली नाही. दोन तासांमध्ये वरळीतील एका गटारात या सीनचं शूटिंग पार पडलं.' अशी माहिती रवी जाधव यांनी दिली.

 
'बँजो कलाकार हे गेल्या 100 हून अधिक वर्षांपासून मुंबईचा अविभाज्य भाग आहेत. मात्र त्यांच्या वाट्याला उपेक्षाच आली आहे. बँजोवादक सकाळपासून रात्रीपर्यंत न थकता काम करतात. त्यामुळे झोपडपट्टीत राहणाऱ्या आमच्या हिरोने त्याच्या कलेतूनच कशी उभारी घेतली, हे आम्हाला दाखवायचं होतं. सगळेच हिरो बाईक, कार किंवा घोड्यावरुन स्क्रीनवर एन्ट्री घेतात, माझा हिरो गटारातून येईल' असं दिग्दर्शक रवी जाधव सांगतात.

 
शूटिंगच्या वेळी डॉक्टरही उपस्थित होते. मात्र रितेशने अंगाला तेल लावल्यामुळे घाण पटकन साफ करायला मदत झाली. रितेशने सिनेमासाठी खूप कष्ट घेतल्याचंही रवी जाधव यांनी सांगितलं आहे.