मुंबई : बेधडक आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असलेले अभिनेते ऋषी कपूर यांच्या प्रकृतीविषयी अद्याप काहीही स्पष्ट झालेलं नाही. ऋषी कपूर यांना थर्ड स्टेजचा कॅन्सर झाल्याची चर्चा बुधवारी रात्रीपासून सुरु झाली होती. मात्र कुटुंबीयांनी ही अफवा असल्याचं सांगितलं.


"ऋषी कपूर यांच्या चाचण्या व्हायच्या आहेत. त्यांना काय त्रास आहे आणि कोणत्या आजाराने ते त्रस्त आहेत, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. इतकंच नाही तर  ऋषीलाही माहित नाही की त्याला काय झालंय. वैद्यकीय चाचण्यांच्या प्रक्रियेला अद्याप सुरुवात झालेली नाही. त्यामुळे त्यांना अॅडव्हान्स स्टेजचा कॅन्सर झाल्याचं अंदाज लोक कसा काय लावत आहेत? ऋषीच्या सगळ्या चाचण्या होऊ दे. रिपोर्ट आल्यावर आम्ही सर्वांना याची माहिती देऊ," असं रणधीर कपूर यांनी सांगितलं.

मागील आठवड्यातच ऋषी कपूर अमेरिकेला रवाना झाले होते. विशेष म्हणजे आई कृष्णा राज कपूर यांचं 1 ऑक्टोबरला निधन झालं. परंतु त्यांच्या अंत्यदर्शनालाही ऋषी कपूर, नितू कपूर आणि रणबीर कपूर उपस्थित नव्हते. यामुळेच ऋषी कपूर यांना ब्लड कॅन्सर असून लवकरच त्यांची किमोथेरपी सुरु होणार असल्याच्या अफवांनी जोर पडकला आहे.

तिथे रवाना होण्याआधी ऋषी कपूर यांनी ट्वीट केलं होतं की, "मी कामातून छोटा ब्रेक घेऊन काही वैद्यकीय उपचारांसाठी अमेरिकेला जात आहे. माझ्या शुभचिंतकांनी काळजी करु नये किंवा कोणतेही अंदाज लावू नये. अभिनेता म्हणून 45 वर्ष काम करताना माझ्या शरीराने बऱ्याच गोष्टी सहन केल्या आहे. तुमच्या प्रेम आणि शुभेच्छांनी मी लवकरच परत येईन."


ऋषी कपूर यांच्यासोबत पत्नी नीतू सिंह आणि मुलगा रणबीर कपूरही अमेरिकेला रवाना झाले आहेत. तेव्हापासूनच ऋषी कपूर कॅन्सरच्या उपचारांसाठी अमेरिकेला गेल्याच्या अफवांना पेव फुटला. ऋषी कपूर यांची मुलगी रिद्धिमाही लवकरच अमेरिकेला जाणार आहे. यानंतर रणबीर कपूर त्याच्या राहिलेल्या चित्रपटांचं काम पूर्ण करण्यासाठी भारतात परत येणार आहे.