मुंबई : सुमारे एक वर्षापूर्वी म्हणजेच 2 सप्टेंबर 2018 रोजी अभिनेते ऋषी कपूर यांनी एक ट्वीट करुन त्यांच्या चाहत्यांना धक्का दिला होता. 'काही वैद्यकीय उपचारासाठी' अमेरिकेत जात आहे, असे त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटले होते. यावेळी लवकरच परत येण्याचे आश्वासनही त्यांनी दिले होते. परंतु कोणत्या आजाराच्या उपचारासाठी जात आहे, हे मात्र त्यांनी सांगितले नव्हते. कपूर हे कर्करोगावरील उपचारासाठी न्यू यॉर्कला गेले होते, याबाबत महिन्याभरापूर्वी खुलासा करण्यात आला. उपचार संपवून ते आता मायदेशी परतले आहेत. 10 सप्टेंबर रोजी (आज) पहाटे 2.45 वाजता कपूर मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले.


नुकताच ऋषी कपूर यांनी नुकताच न्यूयॉर्कमधील एका रेस्टॉरंटमध्ये त्यांचा 67 वा वाढदिवस (4 सप्टेंबर) साजरा केला होता. यावेळी ऋषी कपूर यांच्या पत्नी नीतू सिंह आणि अभिनेते अनुपम खेर त्यांच्यासोबत होते.

ऋषी कपूर यांनी दीड महिन्यांपूर्वी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते कर्करोगावर उपचार घेत असल्याचे सांगितले होते. ते आता घरी परतले आहेत. कपूर म्हणाले की, वर्षातून किंवा दीड वर्षातून एकदा तपासणीसाठी न्यूयॉर्कला जावे लागेल. मुंबईत परतल्यानंतर ते 15 दिवस विश्रांती घेणार आहे आणि त्यानंतर सप्टेंबरअखेर चित्रपटांच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.