मुंबई : आर्चीचा सैराट अंदाज लवकरच नव्याने अनुभवता येणार आहे. ब्लॉकबस्टर 'सैराट'मधून घराघरात पोहोचलेली रिंकू राजगुरु आणखी एका सिनेमातून रुपेरी पडद्यावर अवतरणार आहे.


'रिंगण'फेम मकरंद मानेने त्याच्या नव्या सिनेमासाठी रिंकूची निवड केली आहे. गंमत म्हणजे मकरंद आणि रिंकू या दोघांनाही एकाच वर्षी राष्‍ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

'रिंगण' सिनेमातून मकरंदमधला संवेदनशील दिग्दर्शक दिसला तर 'सैराट'मधून रिंकूमधली अभिनेत्री समोर आली. त्यामुळे आता या दोघांची एकत्रित कलाकृती कशी असेल याची उत्सुकता नक्कीच वाढली आहे.

दिवाळीच्या मुहूर्तावर या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. परंतु या चित्रपटाचं नाव गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. 'उदाहरणार्थ निर्मित'चे सुधीर कोलते आणि विकास हांडे या चित्रपटाची निर्मिती करत आहे.



सैराटच्या जबरदस्त यशानंतर रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर या दोघांकडे साऱ्यांचंच लक्ष होतं. त्यात आकाश ठोसरला थेट महेश मांजरेकरांकडून ऑफर आली. त्याने ती स्वीकारली पण सिनेमा साफ आपटला.

रिंकूने तुलनेत सोपा गेम खेळला आणि ती 'सैराट'च्या कन्नड व्हर्जनमध्ये झळकली. पण तिच्याही नशिबी फार काही पडलं नाही.

त्यामुळे आता या दोघांनाही जपून पावलं टाकावी लागणार आहेत. त्यात रिंकूला मकरंद मानेसारखा दिग्दर्शक लाभल्याने अपेक्षा वाढल्या आहेत एवढं मात्र नक्की.