मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री इशा देओलच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं आहे. मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये सोमवारी पहाटे इशाने मुलीला जन्म दिला.
प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी दुसऱ्यांदा आजी झाल्या आहेत. इशा ही हेमा मालिनी आणि सुपरस्टार धर्मेंद्र यांची मोठी कन्या, तर त्यांची धाकटी मुलगी आहनाने 2015 मध्ये मुलाला जन्म दिला होता. आहना आणि वैभव व्होरा यांना डॅरिअन हा मुलगा आहे.
काही वर्ष डेटिंग केल्यानंतर फेब्रुवारी 2012 मध्ये इशा आणि बिझनेसमन भरत तख्तानी यांनी साखरपुडा केला. तर जून 2012 मध्ये ते दोघं विवाहबंधनात अडकले होते. एप्रिल महिन्यात इशाने प्रेग्नंसीबाबत घोषणा केली होती.
इशा देओल 2015 पासून चित्रपटसृष्टीपासून दूरच राहिली आहे. 2002 मध्ये 'कोई मेरे दिल से पूंछे' चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. इशाची भूमिका असलेले युवा, धूम, काल, दस, नो एन्ट्री यासारखे चित्रपट गाजले आहेत.