Continues below advertisement

Renuka Shahane:हम आपके हैं कौन’मध्ये सलमान खानच्या वहिनीची भूमिका साकारलेली आणि ‘सर्कस’ सारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये प्रभावी अभिनयामुळे घराराघात पोहोचलेली अभिनेत्री रेणुका शहाणे (Renuka Shahane) एका विवाहित निर्मात्याची पोलखोल केलीय. त्यांनी  अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान स्वतःच्या सुरुवातीच्या काळातील कटू अनुभवांबद्दल सांगितले.  त्यांच्या करियरच्या सुरुवातीला आलेला एक घृणास्पद प्रस्ताव ऐकून मी आणि माझी आई दोघीही सुन्न झाल्याचं त्या म्हणाल्या. त्यांनी हेही सांगितले की, चित्रपटांत मोठे नाव असूनही आणि फिल्मी घराण्यातील असल्याने रवीना टंडनसारख्या अभिनेत्रीला देखील सेटवर स्वतःच्या सुरक्षिततेसाठी सतत सतर्क राहावे लागे. (Bollywood News)

एका विवाहित निर्मात्याचा घृणास्पद प्रस्ताव

रेणुका म्हणाल्या की, करिअरच्या सुरुवातीच्या काळात एक निर्माता थेट त्यांच्या घरीच आला आणि अत्यंत घाणेरडा प्रस्ताव दिला. “तो स्पष्टपणे म्हणाला की तो विवाहित आहे, मात्र मला एका साडी ब्रँडची अॅम्बेसेडर बनवू इच्छितो. त्यासाठी फक्त माझ्यासोबत राहा, मला दर महिन्याला पगार देईन” असे तो म्हणाला. हा प्रस्ताव ऐकून मी आणि माझी आई अक्षरशः सुन्न झालो, असे रेणुका म्हणाल्या. त्यांनी ताबडतोब नकार दिला आणि त्या निर्मात्याला घराबाहेर जाण्यास सांगितले.

Continues below advertisement

विरोध केला की शक्तिशाली लोक काम अडवतात!

रेणुकांनी हा प्रस्ताव ठामपणे नाकारला. परंतु त्या निर्मात्याने नंतर तोच प्रस्ताव इतरांकडेही नेला. त्यांनी सांगितले की, चित्रपटसृष्टीत सर्वांसाठी हे इतके सोपे नसते. “कधी कधी अशा लोकांचा अहंकार दुखावला की ते बदला घेण्याची संधी शोधतात. ‘याला काम देऊ नका’ असे सांगून कलाकाराचा प्रवास रोखण्याचा प्रयत्न होतो,” असे त्यांनी नमूद केले. रेणुकांच्या बाबतीत असे घडले नाही, पण अनेक नवोदितांना हे सहन करावे लागते, हे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

छळाची तक्रार उलटण्याचीच जास्त शक्यता

रेणुकांनी मनोरंजनसृष्टीतील आणखी एक पैलू उघड केला. रेणुकांनी स्पष्ट केले की, छळाची तक्रार करणाऱ्यांना अनेकदा उलटछळाला सामोरे जावे लागते. “पीडितेची प्रकल्पातून हकालपट्टी केली जाते, अधिक त्रास दिला जातो, कधी कधी केलेल्या कामाचे पैसेही रोखले जातात. हा एक गट तयार होतो जो एकत्र येऊन पीडितेला आणखी त्रास देतो,” असे त्यांनी म्हटले.

#MeToo नंतरही आरोपी मुक्त आहेत!

रेणुका यांनी  #MeToo चळवळीच्या परिणामांवरही भाष्य केले. त्यांच्या मते, अनेक आरोपी गंभीर आरोप असूनही पुन्हा कामावर परतले आहेत. “MeToo नंतर ५-६ वर्षांनी आरोपी पुन्हा मोठे प्रकल्प करत आहेत. सर्व काही विसरलं गेलंय. आणि जर तुमच्याकडे पुरावा किंवा पोलीस केस नसेल, तर लोक तुमच्याच निष्ठेबद्दल प्रश्न उपस्थित करतात,” असे त्या म्हणाल्या.