अक्षयकुमार-रजनीकांतच्या '2.0' चित्रपटाची रीलीजिंग डेट जाहीर
एबीपी माझा वेब टीम | 10 Jul 2018 11:30 PM (IST)
29 नोव्हेंबर 2018 रोजी अक्षयकुमार-रजनीकांतचा '2.0' चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि सुपरस्टार रजनीकांत यांच्या बहुप्रतीक्षित 2.0 सिनेमाची रीलीजिंग डेट अखेर जाहीर करण्यात आली आहे. 29 नोव्हेंबर 2018 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 2.0 या सिनेमाचं दिग्दर्शन एस शंकर करत आहेत. सिनेमाचं बजेट 350 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातं. अक्षय कुमार, रजनीकांत, एमी जॅक्सन, सुधांशु पांडे आणि आदिल हुसैन यांसारखे कलाकार या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. अक्षयने या सिनेमात एका विक्षिप्त वैज्ञानिकाची भूमिका साकारली आहे. अक्षयचा हा पहिलाच तामिळ प्रोजेक्ट असून पहिल्यांदाच तो खलनायकाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. सुपरस्टार रजनिकांत वसीगरन या वैज्ञानिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा 2010 मधील 'एंथिरन' या तामिळ सिनेमाचा सीक्वेल आहे. हा चित्रपट सुरुवातीला 25 जानेवारी 2018 रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र पद्मावत, पॅडमॅनसोबत क्लॅश टाळण्यासाठी हा सिनेमा पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर 27 एप्रिल 2018 रोजी चित्रपट रीलीज केला जाणार होता, मात्र ती तारीखही पोस्टपोन झाली. संबंधित बातम्या :