Venu Chya Goshti : ‘वेणूच्या गोष्टी’ (Venu Chya Goshti) हे पुस्तक वाचकांच्या भेटीला आले आहे. नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला आहे. विनोदने आपली मुलगी वेणूसाठी तब्बल 100 गोष्टींचं एक पुस्तक लिहिलं आहे. ‘वेणूच्या गोष्टी’ असे या पुस्तकाचे नाव आहे.
विनोदची आई लक्ष्मी गायकर, नाटककार देवेंद्र पेम, लेखक सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांच्या हस्ते ‘वेणूच्या गोष्टी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला आहे. मुलांनी सुसंकृत व्हावं, त्यांना बालपणापासून वाचनाची गोडी लागावी म्हणून अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक विनोद गायकरने त्याची सुरुवात स्वत:पासून केली आहे.
आमचं बालपण हुंदडण्यात, मौजमस्ती करण्यात गेलं; पण वेणूचं तसं जाणार नाही. वेणू मौज-मजा करणार, खेळणार, हसणार, बागडणार; मात्र त्याच जोडीने तिला वाचनाची आवड लागणार. याचे श्रेय वेणूचा बाबा विनोद गायकर याला जाते. हे पुस्तक फक्त विनोदच्या वेणूसाठी नाही, तर लाखो-करोडो वेणूसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. या पुस्तकाची बाल साहित्य वर्तुळात नक्कीच दखल घेतली जाईल, असे मत ज्येष्ठ लेखक सचिन गोस्वामी यांनी पुस्तक प्रकाशन सोहळ्यात मांडले आहे.
सचिन मोटे म्हणाले,"इंटररनेट, मोबाईल फोनच्या युगात वेणूच्या वयातील मुलं पुस्तकं आणि वाचनापासून दूर जात आहेत. अशावेळेस मुलांना पुन्हा वाचनाकडे वळण्याचे काम विनोदने वेणूपासून केले आहे, ते अतिशय चांगले आहे. आई वडिलांनी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी फक्त पैसे कमवण्या पेक्षा त्यांना वेळ दिला पाहिजे, त्यांच्यावर संस्कार केले पाहिजेत".
'तुम्ही वाचलं पाहिजे असं मला तरी कोणी सांगितले नाही. कळत-नकळत वाचनाची गोडी लागली. वेणू सारख्या कित्येक मुलांना वाचनाची गोडी लागावी म्हणून विनोदने हे पुस्तक बालकथांचे पुस्तक लिहिलंय, ही कल्पनाच सुखावणारी आहे. ‘वेणूच्या गोष्टी’ गोष्टी हे पुस्तक फक्त लहान मुलांनाच नाही, तर मोठ्यांनाही तितकेच उपयोगी ठरेल. लहानांचे बालविश्व समृद्ध करेलच. पण मोठ्यांच्याही त्यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळेल, असे ज्येष्ठ नाटककार देवेंद्र पेम यावेळी म्हणाले.
काळासोबत पुढे जाताना वाचन संस्कृती जगावी, टेक्नोलॉजीच्या बरोबर धावताना हातात पुस्तक घेऊन वाचन करण्याचा आनंद वेणूला मिळावा म्हणून तिच्या आणि तिच्यासारख्या अनेकांच्या भावविश्वाशी जवळीक साधणारं 'वेणूच्या गोष्टी' हे पुस्तक आहे. ‘डीटेक्टीव्ह डकी’, ‘गणू’, ‘जेलु’ ही आणि अशी अनेक पात्र विनोदच्या लिखाणातून आकार घेतं गेली. या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला मनोरंजन विश्वातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. दरम्यान वेणू आणि विनोदने 'हलक्या कानाचा' या गोष्टीचे यावेळी वाचन केलं.
संबंधित बातम्या