मुंबई : बॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री रेखा ही नेहमीच आपल्या अदाकारीसाठी प्रसिध्द आहे. ती इंडस्ट्रीतली अशी अभिनेत्री आहे जीने केवळ आपल्या नजरेनं लोकांच्या हृदयात जागा मिळवळी आहे. तिच्या नजरेच्या अदाकारीने तिला संवाद साधायची गरजच पडत नाही. पण रेखाला कधी अभिनेत्री व्हायचेच नव्हतं हे सांगितल्यास तुम्हाला पटणार नाही. रेखा खरंतर हवाईसुंदरी बनण्याचे आणि आकाशात भरारी मारायचं स्वप्न बघत होती. परंतु भानुरेखाच्या नशिबात होतं की, ती वर्षानुवर्षे फिल्म इंडस्ट्रीवर राज्य करेल आणि घडलंही तसंच. 



हवाईसुंदरी बनण्याचं होतं स्वप्न




रेखाने अभिनय क्षेत्रात संपूर्ण जगभर नाव कमावलं आहे. पण खूपच कमी लोकांना माहित आहे की तिला अभिनय क्षेत्रात पदार्पण करायचेच नव्हते. तर ती त्यापेक्षाही उंच भरारी घेण्याचे स्वप्न बघत होती. तिला हवाईसुंदरी व्हायचं होतं, कारण तिला जगभर भटकायचं होतं. सुरुवातीला तिने चित्रपटात काम करायला नकार दिला होता. पण तिच्या आईच्या सांगण्यावरून तिने चित्रपट स्वीकारला. रेखाचे कुटूंब खूप मोठं होतं, पण कमावणारे कमी. त्यामुळे तिच्या आईने तिला अभिनय क्षेत्र निवडायचा सल्ला दिला. सुरुवातीला नकार देणारी रेखा नंतर आईच्या आग्रहाखातर चित्रपटात काम करायला तयार झाली. 


आर्थिक परिस्थितीमुळे केले अभिनय क्षेत्रात पदार्पण




रेखाची घरची आर्थिक परिस्थिती तशी जास्त काही चांगली नव्हती. त्यामुळेच तिने चित्रपटात काम करायला सुरूवात केली. त्यासोबत तिने वयाच्या 13 व्या वर्षी नववीत असताना शाळेत जाणं बंद केलं. त्यानंतर तीने कधीच शाळेचं तोंडदेखील पाहिलं नाही.