Rekha-Mukesh Aggarwal Marriage : आपल्या सौंदर्याची भुरळ अजूनही पाडणारी अभिनेत्री रेखाने तिच्या व्यावसायिक आयुष्यात खूप यश मिळवले. आजही रेखाच्या अभिनयाची, सौंदर्याची जादू प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. मात्र, रेखाचे वैयक्तिक आयुष्यही चर्चेत राहिले आहे. तिच्या सहकलाकारांसोबतच्या अफेअरपासून ते बिझनेसमन मुकेश अग्रवालसोबतच्या तिच्या लग्नापर्यंत आणि तिच्या पतीच्या आत्महत्येपर्यंतच्या घटना चर्चेत राहिल्या आहेत. रेखाचा विवाह हा मध्यरात्री पार पडला होता. मंदिराचे नियम मोडल्याने त्याची किंमत लग्न लावून देणाऱ्या पुजाऱ्याला चुकवावी लागली.
एका महिन्याच्या ओळखीवर रेखा-मुकेशचा झाला विवाह...
रेखाने दिल्लीतील उद्योगपती मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न केले. दोघांची ओळख एका पार्टीत झाली होती. त्यानंतर मुकेश रेखाच्या प्रेमात पडला. दोघांनी भेटल्यानंतर महिनाभरातच मंदिरात लग्न केले. ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक यासिर उस्मान यांनी रेखाच्या बायोपिक 'रेखा द अनटोल्ड स्टोरी'मध्ये सांगितले आहे की, रेखा आणि मुकेश अग्रवाल यांचे मध्यरात्री लग्न करणे पुजारीला महागात पडले होते.
या पुस्तकानुसार, 4 मार्च 1990 रोजी मुकेश आणि त्याची कॉमन फ्रेंड सुरिंदर कौर अचानक रेखाच्या घरी पोहोचले आणि तिला लग्नाचा प्रस्ताव दिला. काही वेळ विचार केल्यानंतर रेखानेही लग्नासाठी होकार दिला.
मुक्तेश्वर देवालय मंदिरात झाला विवाह...
रेखाने लग्नाला होकार देताच मुकेशला मोठा आनंद झाला. उशीर नको म्हणून आपण लगेचच लग्न करूयात असे म्हटले. त्यावेळी दोघांचेही कुटुंबीय मुंबईत नव्हते. मात्र, त्यांनी तात्काळ लग्न करण्याचे ठरवले. संध्याकाळी रेखाने रेड-गोल्डन कलरची कांजीवरम साडी परिधान करत नववधू प्रमाणे लग्नासाठी तयार झाली. त्यानंतर रेखा आणि मुकेश हे लग्नासाठी जुहूमध्ये मंदिराच्या शोधात निघाले. ते इस्कॉन मंदिरात पोहचले. मात्र, तिथे खूपच गर्दी होती. त्यानंतर त्यांनी मुक्तेश्वर देवालय मंदिरात लग्न करण्याचा निर्णय घेतला.
मंदिराचा नियम मोडून झाला रेखा-मुकेशचा विवाह
रेखा आणि मुकेश मंदिरात पोहचले तेव्हा रात्रीचे 10 वाजले होते. मंदिरातील पुजारीदेखील त्यावेळी झोपण्यासाठी गेले होते. मात्र, मुकेशने पुजारीला झोपेतून उठवले आणि आम्हाला आताच लग्न करायचे आहे, असे सांगितले. नववधू ही रेखा असल्याचे दिसताच पुजारीदेखील हैराण झाले. त्यानंतर मंदिराचा नियम तोडत रेखा आणि मुकेश अग्रवाल यांचा विवाह लावून दिला.
मंदिराचा नियम तोडल्याने झाली कारवाई...
आरतीनंतर मंदिराच्या गाभाऱ्याचे प्रवेशद्वार बंद झाल्यानंतर पुन्हा उघडले जात नाही. मात्र, पुजाऱ्याने या नियमाचे उल्लंघन केले आणि मध्यरात्री रेखा-मुकेशचे लग्न लावून दिले. मात्र, नियमांच्या उल्लंघनाची ही गोष्ट समोर आल्यानंतर पुजारी संजय बोदास यांना मंदिरातून काढून टाकण्यात आले.