Ravi Jadhav On Sushmita Sen Taali Web Series : अभिनेत्री सुष्मिता सेनची (Sushmita Sen) मुख्य भूमिका असलेली 'ताली' (Taali) ही बहुचर्चित वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. क्षितिज पटवर्धनने (Kshitij Patwardhan) लिहिलेल्या या सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा रवी जाधव (Ravi Jadhav) यांनी सांभाळली आहे. 'ताली'सारख्या सीरिजमुळे समाज एक टक्का जरी बदलला तरी मी यशस्वी झालो, असं वक्तव्य रवी जाधव यांनी एबीपी माझाशी बोलताना केलं आहे. 


'ताली' ही सीरिज करण्याचा निर्णय का घेतला याबद्दल एबीपी माझासोबत बोलताना रवी जाधव म्हणाले,"गौरी सावंतने (Gauri Sawant) तिच्या आयुष्यात अनेक संकटांचा सामना केला आहे. पण तरी आयुष्य ती हसत जगते तिची ही गोष्ट मला प्रचंड भावली. त्यामुळेच मी 'ताली' ही सीरिज करण्याचं ठरवलं".


'ताली'साठी सुष्मिता सेनची निवड का केली? 


रवी जाधव म्हणाले,"गौरी सावंतची इच्छा होती की तिच्यावर जर बायोपिक येणार असेल तर त्यात सुष्मिता सेनने काम करावं. सुष्मिता सेनला जेव्हा गौरी सावंतच्या भूमिकेसाठी विचारणा झाल्यानंतर सहा महिन्यांनी विचार करुन तिने या भूमिकेसाठी होकार दिला. या सहा महिन्यात तिने गौरी सावंत या विषयाचा अभ्यास केला. 'ताली'साठी होकार दिल्यानंतर तिने या भूमिकेत स्वत:ला झोकून दिलं. छोट्या-छोट्या गोष्टींवरही तिने खूप मेहनत घेतली आहे". 


'ताली'मुळे समाजाचा ट्रांसजेंडरकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलेल असं वाटतं का?


रवी जाधव म्हणाले,"समाजाचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोण कोणतीही कलाकृती बदलू शकत नाही.कोणतंही माध्यम समाजाला आरसा दाखवण्याचे काम करतात. माध्यम समाजाला वाट दाखवू शकतो पण बदलू शकत नाही. परंतु 'ताली'सारख्या कलाकृतींच्या माध्यमातून एक टक्का जरी समाज बदलला तरी आम्ही यशस्वी झालो".


'ताली' सीरिज किती चॅलेजिंग होती याबद्दल बोलताना रवी जाधव म्हणाले," विश्वसुंदरीला पुरुष म्हणून दाखवणं खूप चॅलेंजिंग होतं. पुरुष खोटा वाटता नये हेदेखील महत्त्वाचं होतं. देहबोलीतील आणि आवाजातले फरक कसे होतात तो एक कमाल बदल आहे. प्रेक्षकांना हे पाहताना थक्क व्हायला होईल. या सर्व गोष्टींसाठी आम्ही सर्वांनीच खूप मेहनत घेतली आहे. एखाद्या नाटकाप्रमाणे खूप तामली केल्या, वर्कशॉप घेतले". 


रवी जाधव यांनी सांगितला 'ताली'च्या शूटिंगदरम्यानचा किस्सा


रवी जाधव म्हणाले,"क्षितीज पटवर्धनने 'ताली' या वेबसीरिजची जेव्हा गोष्ट लिहिली त्यानंतर गौरी सावंत या ऐकवली. या सीरिजच्या शूटिंगदरम्यान दोन-तीन वेळा गौरी सावंत सेटवर आल्या आहेत आणि सुष्मिताला पाहून म्हणायच्या मी खूप छान दिसत आहे. 'ताली' ही सीरिज गौरी सावंतला आवडली". 


संबंधित बातम्या


Kshitij Patwardhan : "गौरी सावंतच्या कहाण्या ऐकून कधी रडलो कधी घाबरलो"; 'ताली'चा लेखक क्षितिज पटवर्धनची पोस्ट चर्चेत