Raveena Tondon : बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनच्या (Raveen Tondon) अडचणीत वाढ झाली आहे. रवीनाने नुकतीच ताडोबाची सैर केली आहे. या सफारीदरम्यानचे तिचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये रवीना वाघाच्या जवळ जाताना दिसत आहे. वाघाच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न केल्याने रवीनाच्या अडचणीत वाढ झाली आहे. 


रवीनाला अभिनयासोबत वाइल्डलाइफ फोटोग्राफीचीदेखील आवड आहे. ती अनेकदा जंगलसफरी करताना दिसून येते. यावेळी जंगलसफरीदरम्यान ती नियमांचं उल्लंघन करत वाघाच्या अधिक जवळ जाताना दिसत आहे. रवीनाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिची जीप वाघाच्या खूप जवळ जाऊन थांबताना दिसत आहे. तसेच फोटो काढताना कॅमेरा शटर्सचादेखील आवाज येत आहे. वाघदेखील तिच्याकडे पाहून डरकाळी फोडताना दिसत आहे. 






व्हिडीओ समोर आल्यानंतर सातपुडा व्याघ्र संवर्धन केंद्राने तपास सुरू केला आहे. सातपुडा व्याघ्र संवर्धन केंद्राचे उपविभागीय अधिकारी धीरज सिंह चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार,"22 नोव्हेंबरला रवीना जंगल सफरीसाठी आली होती. वाघाचा फोटो काढण्यासाठी रवीना वाघाच्या अगदी जवळ जाऊन थांबली होती. त्यामुळे आता या प्रकरणी वाहनचालक आणि त्यावेळी कामावर असलेल्या अधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात येणार असून त्यांची चौकशी होणार आहे". 


ताडोबाआधी रवीनाने भोपाळमधील वन विहार राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली होती. दरम्यान तिने काही मंडळी वाघाच्या पिंजऱ्यामध्ये दगड फेकत असल्याची तक्रार केली होती. तिने ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली होती. त्यानंतर तिच्या ट्वीटची दखल घेत अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला होता. 


सातपुडा व्याघ्र संवर्धन केंद्राच्या नियमांनुसार सफारीदरम्यान वाघ आणि जीप यांच्यात 20 मीटरचं अंतर असणं गरजेचं आहे. पण रवीनाने या नियमांचं पालन केलं नाही. त्यामुळेच आता तिची चौकशी होणार असून तिच्यावर योग्य कारवाई करण्यात येईल. 


बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन 90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आपल्या अभिनयाने तिने चाहत्यांना मनावर राजय केलं आहे. रवीना टंडन बॉलिवूडमध्ये 'मस्त मस्त गर्ल' म्हणून ओळखली जाते. वयाच्या 47 व्या वर्षातही ती खूप ग्लॅमरस दिसते. 


संबंधित बातम्या


Vivek Agnihotri : 'द कश्मीर फाइल्स'च्या वादादरम्यान विवेक अग्निहोत्रींची मोठी घोषणा; ट्वीट करत म्हणाले, आता बनवणार 'द कश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड'