Raundal Official Trailer: 'रौंदळ'(Raundal) या आगामी चित्रपटाची आज सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. टिझरनं रसिकांच्या मनात उत्सुकता जागवण्याचं काम केल्यानंतर या चित्रपटाचा बहुप्रतिक्षीत ट्रेलर आणि संगीत प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला आहे. महालक्ष्मी येथील फेमस स्टुडिओमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात कुमार मंगत पाठक आणि बाळासाहेब शिंदे यांच्या हस्ते 'रौंदळ'चा ट्रेलर लाँच आणि संगीत प्रकाशन करण्यात आले याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञमंडळी उपस्थित होते. 'राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'ख्वाडा'सोबतच संगीतप्रधान 'बबन' या रोमँटिक चित्रपटात दिसलेल्या भाऊसाहेब शिंदेचा अँग्री यंग मॅन लुक 'रौंदळ'च्या ट्रेलरचं मुख्य आकर्षण ठरत आहे. 3 मार्च 2023 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
'रौंदळ'ची निर्मिती भूमिका फिल्म्स अॅण्ड एंटरटेनमेंट या संस्थेअंतर्गत बाळासाहेब शिंदे, डॉ. पुरुषोत्तम भापकर, प्रमोद चौधरी, भाऊ शिंदे आणि राईज बिझनेस ग्रुप यांनी केली आहे. रवींद्र औटी, संतोष औटी , कैलाश गुंजाळ आणि संजय कुंजीर या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. या संगीतप्रधान रोमँटिक चित्रपटाचं दिग्दर्शन गजानन नाना पडोळ यांनी केलं आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमधील भाऊसाहेब शिंदेचं रूप नजर खिळवून ठेवणारं आहे. नवोदित अभिनेत्री नेहा सोनावणेसोबतची भाऊसाहेबची केमिस्ट्री प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणार आहे. 'अहो, लय अहंकार नका करू. सोन्याची लंका होती रावणाची...' अशा प्रकारचे अर्थपूर्ण संवाद या चित्रपटाचा सर्वात मोठा प्लस पॅाइंट ठरणार असल्याचं ट्रेलर पाहिल्यावर जाणवतं. एका सर्वसामान्य तरुणाचा अन्यायाविरोधातील लढा 'रौंदळ'मध्ये पहायला मिळणार असल्याचे संकेत ट्रेलर पाहिल्यावर मिळतात. गाव-खेड्यातील राजकारण आणि त्यात पिचला जाणारा शेतकरी, अत्याचाराला वाचा फोडणारा नायक, त्याची प्रेमकहाणी, त्याचा संघर्ष, इतरांसाठीचा त्याचा लढा, संपूर्ण सिस्टीमविरोधात एकटा उभा ठाकलेला नायक, साखर कारखान्यातील राजकारण, सुमधूर गीत-संगीत, खरीखुरे वाटणारे अॅक्शन सीन्स, सत्तेविरोधातील युद्ध, गुन्हेगारीविरोधातील स्वत:च्या हक्कासाठीची लढाई असे बरेचसे पैलू या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटातील 'मन बहरलं...', 'ढगानं आभाळ...' आणि 'भलरी...' हि गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. संगीतकार हर्षित अभिराज यांनी या चित्रपटातील गाण्यांना संगीत दिलं आहे. डॅा. विनायक पवार, बाळासाहेब शिंदे आणि सुधाकर शर्मा यांनी लिहिलेल्या गीतांना सोनू निगम, जावेद अली, स्वरूप खान, दिव्य कुमार, वैशाली माडे, हर्षित अभिराज, गणेश चंदनशिवे यांच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आली आहेत.
पाहा ट्रेलर:
या चित्रपटात संजय लाकडे, यशराज डिंबाळे, सुरेखा डिंबाळे, शिवराज वाळवेकर, गणेश देशमुख, सागर लोखंडे आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत. महावीर साबन्नावरनं सिंक साऊंड आणि डिझाईन केलं असून, फाईट मास्टर मोझेस फर्नांडीस यांनी अॅक्शन सीन्स डिझाईन केले आहेत. सिनेमॅटोग्राफी अनिकेत खंडागळे यांची, तर संकलन फैझल महाडीक यांचं आहे. कला दिग्दर्शन गजानन सोनटक्के यांनी केलं आहे. नेहा मिरजकर यांनी कोरिओग्राफी केली असून, पार्श्वसंगीत रोहित नागभिडे यांनी दिलं आहे. कॅास्च्युम्स डिझाईन सिद्धी योगेश गोहिल यांनी केले असून मेकअप समीर कदम यांनी केला आहे. वॅाट स्टुडिओमध्ये या सिनेमाचे डीआय करण्यात आलं असून, डीआय कलरीस्ट श्रीनिवास राव आहेत. कार्यकारी निर्माते मंगेश भिमराज जोंधळे, तर असोसिएट दिग्दर्शक विक्रमसेन चव्हाण आहेत. सतिश येले यांनी व्हिएफएक्स सुपरवायजिंग केलं असून, आॅनलाईन एडीटींग माही फिल्म्स लॅबचे विक्रम आर. संकपाळे यांनी केलं आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Kili Paul : 'परदेसिया' गाण्यावर थिरकला किली पॉल; व्हिडीओ व्हायरल