'सिम्बा'ची डरकाळी! 'चेन्नई एक्स्प्रेस'ला मागे टाकत नवा विक्रम
एबीपी माझा वेब टीम | 16 Jan 2019 08:42 AM (IST)
रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिम्बा'ने अवघ्या तीन आठवड्यांच्या आतच देशात 227.21 कोटींच्या पार गल्ला जमवला. जगभरात 'सिम्बा'ने 350 कोटींच्या पार कमाई केल्याची माहिती आहे.
मुंबई : 2018 च्या अखेरीस प्रदर्शित झालेल्या रणवीर सिंहच्या 'सिम्बा' चित्रपटामुळे बॉलिवूडसाठी नववर्षाची सुरुवातही गोड झाली. भारतातील बॉक्स ऑफिसवर 'सिम्बा'ने 227 कोटींची कमाई केली आहे. शाहरुख-दीपिकाच्या 'चेन्नई एक्स्प्रेस' चित्रपटाला मागे टाकत 'सिम्बा'ने नवा विक्रम रचला आहे. यासोबतच 2018 या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत रणवीरच्या दोन सिनेमांचा समावेश झाला आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिम्बा'ने अवघ्या तीन आठवड्यांच्या आतच देशात 227.21 कोटींच्या पार गल्ला जमवला. जगभरात 'सिम्बा'ने 350 कोटींच्या पार कमाई केल्याची माहिती आहे. 28 डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या सिम्बाने पहिल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी 20.72 कोटी रुपयांची कमाई केली होती. सिम्बा हा रणवीरची भूमिका असलेला सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा सिनेमा ठरला आहे. 80 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेला हा सिनेमा जगभरात चार हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला. रोहित शेट्टी - द ग्रेट शंभर कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करणारा 'सिम्बा' हा रोहित शेट्टीचा आठवा सिनेमा ठरला आहे. यापूर्वी गोलमाल अगेन (वर्ष 2017- कमाई 205 कोटी), दिलवाले ( 2015 - 148 कोटी), सिंघम रिटर्न्स ( 2014 - 140 कोटी), चेन्नई एक्स्प्रेस ( 2013 - 227 कोटी), बोलबच्चन ( 2012 - 102 कोटी), सिंघम ( 2011 - 100 कोटी), गोलमाल 3 (2010 - 106 कोटी) असे सिनेमे या यादीत आहेत. 2018 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत तिसरा 2018 या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत सिम्बाने तिसऱ्या स्थानावर उडी घेतली आहे. विशेष म्हणजे या यादीतील टॉप 4 सिनेमांमध्ये रणवीरच्या दोन चित्रपटांचा समावेश असून खान मंडळींचं वर्चस्व मोडित निघालं आहे. पहिल्या चार चित्रपटात शाहरुख-आमीर-सलमान पैकी एकाही 'खान'ला स्थान मिळवता आलेलं नाही. रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेला संजय दत्तचा बायोपिक 'संजू' (342 कोटी) हा 2018 या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित, रणवीरचीच भूमिका असलेला दीपिका-शाहीदसोबतचा 'पद्मावत' (302 कोटी) या यादीत दुसरा आहे. तिसऱ्या क्रमांकावरील 'सिम्बा'नंतर रजनीकांतचा '2.0' (188 कोटी) आहे. दमदार सिम्बा रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर सिंह आणि सैफची मुलगी सारा अली खान यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाच्या शेवटी 'सिंघम' अजय देवगनचं दर्शन घडतं, तर पुढच्या भागात 'वीर रघुवंशी' म्हणून अक्षय कुमार झळकणार असल्याचंही रोहित शेट्टीने जाहीर केलं आहे. आशुतोष राणा, व्रजेश हिर्जी, सोनू सूद, सुलभा आर्य यासारखे दिग्गज कलाकारही 'सिम्बा'मध्ये झळकले आहेत. त्याशिवाय सुचित्रा बांदेकर, अश्विनी काळसेकर, सिद्धार्थ जाधव, विजय पाटकर, सौरभ गोखले, अशोक समर्थ, वैदेही परशुरामी, नेहा महाजन अशा अनेक मराठी कलाकारांची फौजही सिनेमात पाहायला मिळत आहे. आतापर्यंत रणवीर सिंगच्या सिनेमांनी पहिल्या दिवशी केलेल्या कमाईत सिम्बा अव्वल ठरला आहे. गुरुवारी प्रदर्शित झालेल्या 'पद्मावत'ने 19 कोटी, 'गुंडे'ने 16.12 कोटी, 'गोलीयों की रासलीला- रामलीला'ने 16 कोटी, 'बाजीराव मस्तानी'ने 12.80 कोटी कमावले होते.