मोबाईलवर बोलत रॅश ड्रायव्हिंग, वाहनचालकावर रणवीर चिडला
एबीपी माझा वेब टीम | 05 Sep 2018 10:54 PM (IST)
मोबाईलवर बोलत ड्रायव्हिंग करणारा संबंधित कारचालक रणवीरच्या कारला धडकणार होता, त्यामुळे रणवीरचा पारा चढला.
मुंबई : बेदरकार ड्रायव्हिंग करणाऱ्या वाहनचालकाला अभिनेता रणवीर सिंहने दटावल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. मोबाईलवर बोलत ड्रायव्हिंग करणारा संबंधित कारचालक रणवीरच्या कारला धडकणार होता, त्यामुळे रणवीरचा पारा चढला. रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या वाहनचालकाला अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने ओरडल्याची घटना ताजी असतानाच रणवीरबाबतही असाच प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. संबंधित वाहनचालकाने ट्विटरवर रणवीर डाफरत असतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये रणवीर नीट दिसत नसला, तरी रणवीरने आपल्याला शिवीगाळ केल्याचा दावा वाहनचालकाने केला आहे. 'तुमच्यासारख्या माणसांना वागण्या-बोलण्याचं तारतम्य असायला हवं. कोणाच्या आई-बहिणीसमोर शिव्या देऊ नयेत, हेसुद्धा समजत नाही का. असाच अॅटिट्यूड राहिला तर लवकरच रस्त्यावर येशील. आधी लोकांशी कसं बोलावं हे शिकून घे मग हिरो हो फ्लॉप अभिनेत्या' असं ट्वीट त्याने केला आहे. व्हिडिओमध्ये केवळ वाहनचालक सॉरी बोलत असल्याचं ऐकू येतं. ट्विटराईट्सनी मात्र रणवीर सिंगची बाजू घेत वाहनचालकालाच फैलावर घेतलं आहे. रणवीर ओरडत असल्याचा व्हिडिओ शूट करण्यापेक्षा चूकांमधून काहीतरी शिक, असं काही जणांनी त्याला सांगितलं. तर कोणी वाहतुकीच्या नियमांचं पालन करण्याचा सल्लाही त्याला दिला.