मुंबई : 'जग्गा जासूस' सिनेमातील गोविंदाची भूमिका कापल्याची संपूर्ण जबाबदारी अभिनेता रणबीर कपूरने स्वीकारली आहे. शिवाय याबाबत रणबीरने गोविंदाची माफीही मागितली आहे.

गोविंदा जग्गा जासूसच्या निर्मात्यांवर नाराज असल्याचं वृत्त होतं. या सिनेमात गोविंदाला भूमिका देण्यात आली होती. पण सिनेमाच्या चित्रीकरणाला उशिर झाल्याने कथेमध्ये बदल करुन गोविंदाचा रोल कापण्यात आला. गोविंदाने या भूमिकेचे काही दृश्यही चित्रीत केली होती. पण मी चित्रपटाचा भाग नसूनही माझ्या फोटोचा वापर सिनेमाच्या प्रसिद्धीसाठी केला जात असल्याचं गोविंदाचं म्हणणं आहे.

यासंदर्भात बोलताना रणबीरने म्हणाला की, "दुर्दैवाने, स्क्रिप्टमध्ये बदल करताना त्यांची (गोविंदा) पूर्ण भूमिकाच कापण्यात आली. हा चित्रपट घाईगडबडीनेच सुरु केला होता. त्यावेळी संपूर्ण कथा तयार नव्हती. यानंतर सिनेमातील व्यक्तिरेखा पूर्णपणे बदलण्यात आल्या, कारण सिनेमाच्या चित्रीकरणासाठी आधीच फार उशिर झाला होता."

"गोविंदासारख्या महान कलाकाराला आम्ही सिनेमात घेतलं पण त्यांच्या भूमिकेला न्याय दिला नाही, याचं मला दु:ख आहे. आम्ही सगळे याबाबत माफी मागतो. परंतु सिनेमा चांगला बनण्यासाठी यातील काही भाग कापणं आवश्यक होतं," असंही रणबीर पुढे म्हणाला.

गोविंदाची भूमिका कापल्यानंतर दिग्दर्शक अनुराग बासूने बंगाली अभिनेता सास्वत चॅटर्जी यांची निवड केली, ज्यांनी या चित्रपटात रणबीरच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. सास्वत चॅटर्जीने याआधी हिंदी चित्रपट 'कहानी'मध्ये मारेकरी बॉबची भूमिका साकारली होती.